Chinchwad News : वर्षभरात 58 नवविवाहितांनी केली आत्महत्या

एमपीसी न्यूज – ‘हुंडा आणि त्यासाठी केला जाणारा छळ’ याच कारणावरून अनेक संसार मोडतात. काही नवविवाहिता तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षभरात 58 नवविवाहितांनी आत्महत्या केली आहे.

हुंडा घेणे आणि हुंडा देणे या दोन्ही बाबी गुन्ह्यास पात्र आहेत. हुंडाबळीच्या अनेक घटना पोलीस ठाण्यात दाखल होतात. नवविवाहितांच्या आत्महत्येसाठी हुंडा हा महत्वाचा घटक आहे. नवीन घर घेण्यासाठी, जागा घेण्यासाठी, तर कधी गाडी घेण्यासाठी, व्यवसाय सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली जाते.

लग्नात मानपान केला नाही, मानपान करण्यात काही कसर राहिली, तर त्यावरून देखील विवाहितांचा छळ केला जातो. हुंडा आणला नाही, मानपान केला नाही. लग्नात चांगल्या वस्तू दिल्या नाहीत, दागिने आणले नाहीत अशा अनेक कारणांवरून लग्नाची हळद उतरण्यापूर्वीच विवाहितेसोबत वाद घालण्यास सुरुवात होते.

घरगुती अडचणी, पैशांची मागणी याचबरोबर चारित्र्यावर संशय घेऊन देखील छळ केला जातो. लग्नामुळे दोन कुटुंब एकमेकांशी जोडली जातात. पण माणसांपेक्षा अधिक किंमत पैशाला आली असल्याने नात्यातही पैसा महत्वाचा ठरतो. त्यावरूनच नवीन घरात नवीन स्वप्ने घेऊन आलेल्या विवाहितेला जगणे असह्य केले जाते. शेवटी ती विवाहिता आत्महत्या करणे पसंत करते.

नात्यांना जर विवाहापूर्वीच्या दुर्घटनांचे ग्रहण लागले असेल तर विवाहानंतर अनेक अडचणी येतात. त्यातून भांडणे, संशय, तिरस्कार वाढीस लागतो. मग मृत्यू हाच पर्याय असल्याचे समजून या विवाहिता मृत्यूला कवटाळतात. अनेक महिला गळफास घेऊन, विषारी औषध पिऊन आत्महत्या करतात.

विवाहितांना मानसिक आधाराची गरज असते. त्याचं मन मोकळं व्हायला हवं. सगळं संपलंय असं वाटू न देता जगण्याची उमेद शोधून आयुष्य जगता आलं पाहिजे. पिंपरी-चिंचवड शहरात सन 2020 मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात 45 नवविवाहितांनी आत्महत्या केली. तर यावर्षी वर्षभरात 58 नवविवाहितांनी आत्महत्या केली. एप्रिल महिन्यात सात तर जुलै महिन्यात 8 नवविवाहितांनी आत्महत्या केली. हे प्रमाण इतर महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

वर्षभरात नवविवाहितांनी केलेल्या आत्महत्या –
जानेवारी – 6
फेब्रुवारी – 4
मार्च – 6
एप्रिल – 7
मे – 2
जून – 5
जुलै – 8
ऑगस्ट – 6
सप्टेंबर – 2
ऑक्टोबर – 6
नोव्हेंबर – 3
डिसेंबर – 3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.