Pimpri : डस्टबिन खरेदीचा निर्णय तूर्तास स्थगित; 18 कोटींचा निधी पुन्हा घनकचरा व्यवस्थापनासाठी वर्ग

एमपीसी न्यूज – महापालिकेने डस्टबिन खरेदी करण्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, ती रक्कम डस्टबिन खरेदीसाठी आवश्यक नसल्याने त्यातील 18 कोटी रुपये आरोग्य विभागाच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी वर्ग करण्यात आले आहेत. कचरा विलगीकरणाच्या उद्देशासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुन्हा डस्टबिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गैरव्यवहार व चुकीच्या खरेदीप्रक्रियेचे जोरदार आरोप झाल्यानंतर आरोग्य विभागाने माघार घेतली आहे. आता डस्टबिन खरेदीचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम या योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून डस्टबिन खरेदी करण्यात आली. मार्च 2014 मध्ये 6 कोटी 59 लाख 61 हजार 289 रुपये खर्चून 9 लाख 30 हजार 344 डस्टबीन भांडार विभागामार्फत खरेदी करण्यात आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप त्यावेळीही झाले होते. तर, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून पालिकेला 27 हजार 352 डस्टबिन उपलब्ध झाले होते. शहरातील सर्व कुटुंबाना ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी प्रत्येकी दोन डस्टबिनचे आरोग्य विभागाने वाटप केले होते.

दरम्यान, डस्टबिन वाटपानंतर ओला व सुका कचरा वेगळा जमा झालाच नाही. तरीही आरोग्य विभागाने पुन्हा नव्याने डस्टबिन खरेदी करण्याचा घाट घातला. दोन किंवा तीन डस्टबिन देण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा मांडण्यात आला. डस्टबिन खरेदीसाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी वर्गीकरण करून घेण्यात आला होता. या खरेदी प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. तसेच यामध्ये राजकीय हीतसंबंधाचेही आरोप झाले. यामुळे डस्टबिनची खरेदी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डस्टबिन खरेदी या लेखाशिर्षावरील 18 कोटी रक्कम पुन्हा आरोग्य विभागाकडील घनकचरा व्यवस्थापन या लेखाशिर्षावर वर्ग करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.