BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : दत्ता साने यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षाचा कार्यकाल संपुष्टात 

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दत्ता साने यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षभराचा कार्यकाल उद्या (शुक्रवारी) संपुष्टात येत आहे. अधिकाधिक नगरसेवकांना संधी मिळावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी  विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने पक्षश्रेष्ठी नवीन चेह-याला संधी देणार की साने यांना मुदतवाढ मिळणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे.  

पिंपरी महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागले. 36 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता विरोधी पक्षनेता आहे. तसेच विरोधी पक्षनेता हा स्मार्ट सिटीचा पदसिद्ध संचालक असतो. त्यामुळे हे पद मानाचे आहे. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पाहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने तगडा मोहरा असलेल्या योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. त्याचवेळी प्रत्येकवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार 17 मार्च 2017 रोजी विरोधी पक्षनेतेपदी बसलेल्या बहल यांनी एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर 5 मे 2018 रोजी पदाचा राजीनामा दिला होता.

बहल यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखलीतील ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची 17 मे 2018 रोजी विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली होती. साने यांची वर्षभराची कामगिरी सरस राहिली आहे. त्यांनी विविध विषयांवर आवाज उठविला. विविध प्रश्नांवार हटके पद्धतीने आंदोलने केली. चुकीच्या कामाविरोधात सातत्याने आवाज उठवून सत्ताधा-यांना जेरीस आणले. पक्षाच्या अलिखित ठरलेल्या नियमानुसार साने यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा एक वर्षाचा कार्यकाल उद्या (शुक्रवारी 17 मे ) संपुष्टात येत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून साने यांना मुदतवाढ दिली जाते की राजीनामा घेतला जातो? याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ”अधिका-अधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याबाबतचे पक्षाचे धोरण ठरले आहे. त्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने विरोधी पक्षनेता बदलण्यात येईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्याबाबतची पुढील कार्यवाही केली जाईल”.

‘हे’ आहेत विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छूक!

विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, नाना काटे, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, मयुर कलाटे हे इच्छूक आहेत. इच्छुकांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा झोकून देऊन प्रचार केला. विरोधी पक्षनेतेपदासाठी मिसाळ यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. पहिल्यांदा पिंपरी आणि दुस-या वेळी भोसरी मतदारसंघातील नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिस-या वेळी कोणत्या मतदारसंघात विरोधी पक्षनेतेपद दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.