Pune News : वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय

दोन टक्के रक्कम भरून योजनेत सहभागी होण्याची संधी

एमपीसी न्यूज – महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली असून आर्थिक अडचणीत असलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. सोबतच खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्याची संधी देण्यात आली आहे.

या योजनेमध्ये वीजपुरवठा सुरु असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीजग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. उच्चदाब वीजग्राहकांना मंडल कार्यालय, 20 किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना विभागीय कार्यालय आणि 20 किलोवॅटपर्यंत वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना उपविभाग कार्यालयांमध्ये अर्ज करून या योजनेत सहभागी होता येईल. चालू वीजबिलाच्या रकमेचे हप्ते देण्याबाबत वीजग्राहकांच्या अर्जांवर 7 दिवसांत तर वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांच्या अर्जांवर 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. यासोबतच महावितरणच्या वेबसाईटवर या योजनेचे लवकरच स्वतंत्र पोर्टल सुरु होत असून त्याद्वारेही वीजग्राहकांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील उच्च व लघुदाब ग्राहकांना चालू वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी या योजनेमध्ये तीन हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी डाऊन पेमेंट करण्याची गरज नाही. तसेच ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या सुरु आहे मात्र वीजबिल थकीत आहे अशा आणि तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार ग्राहकांनी 30 टक्के डाऊन पेमेंट करून या योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना जास्तीत जास्त 12 सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. सोबतच खंडित झालेली वीजजोडणी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये तात्पुरता वीजपुरवठा खंडित होऊन सहा महिन्यांपर्यंत कालावधी झाला असल्यास पुनर्जोडणी शुल्क भरून वीजजोडणी पुन्हा सुरु करता येईल. तर सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून वीजपुरवठा खंडित असल्यास संबंधीत ग्राहकांना नवीन अर्ज करावा लागेल व वीजजोडणी शुल्क भरून नवीन वीजजोडणी कार्यान्वित करता येईल. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील थकबाकीच्या व्याजाची 50 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे.

वीजबिलांसंबंधी न्यायप्रविष्ट प्रकरणातून विनाअट माघार घेण्यास तयार असलेल्या संबंधीत वीजग्राहकांना या योजनेमध्ये सहभागी होता येईल. तसेच भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार वीजचोरीच्या 126, 138 किंवा 135 कलमानुसार वीजचोरीची रक्कम भरून उर्वरित थकबाकी भरण्यासाठी संबंधीत ग्राहकांना योजनेमध्ये सहभागी होता येईल.

या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करते वेळी एकूण थकबाकीची दोन टक्के रक्कम संबंधीत ग्राहकांना भरावी लागेल. तसेच दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरद्वारे योजनेमधील विनाअट सहभागाचे प्रतिज्ञपत्र सादर करावे लागेल. अर्ज मंजुरीनंतर सात दिवसांमध्ये 30 टक्के डाऊन पेमेंट करणे आवश्यक आहे. या योजनेत सहभागी झाल्यानंतर चालू वीजबिलांसह दिलेल्या हप्त्यांप्रमाणे थकबाकीची रक्कम नियमित स्वरुपात भरणे आवश्यक आहे. या योजनेत 2020-21 या आर्थिक वर्षामध्येच सहभागी होण्याची मुदत असल्याने थकबाकीदार वीजग्राहकांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा व योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.