Pimpri : सावरकर मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या  महिला विभागाच्या वतीने पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत निगडी, प्राधिकरण आणि आकुर्डी तसेच खेड, दिघी, चाकण, वडगाव मावळ भागातील विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. पर्यावरणपूरक पद्धतीने शाडूच्या मातीने सर्वांनी गणपती बनविला.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती विसर्जित केल्यानंतर काही दिवसांपर्यंत या मूर्तीचे पाण्यामध्ये विघटन होत नाही. त्यामुळे नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. ही जनजागृती करत असताना केवळ इतरांना उपदेश न करता त्यासोबत स्वतः पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करायला हवी. पर्यावरण पूरक गणपतीची संकल्पना आपल्या कृतीतून समाजात रुजविण्याची स्वतःपासून सुरुवात करून समाजापर्यंत पोहोचविणे हे या कार्यशाळेचे उद्धिष्ट आहे.

तब्बल 175 जणांनी पर्यावरणपूरक गणपती बनविण्याच्या कार्यशाळेत सहभाग घेतला. सहभागी सर्वजण तयार केलेल्या गणपतीची गणेशोत्सवात स्थापना करणार आहेत. या उपक्रमामुळे शहरातील 175 घरांमध्ये पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना होणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे होणा-या प्रदूषणावर या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.

प्रशिक्षक म्हणून मृणालिनी पाटील, स्वप्नील भोंडवे, सौरभ घोगरे यांनी काम पाहिले. तर अनुजा वनपाळ, विनिता श्रीखंडे, मुक्ता चैतन्य, सुमती कुलकर्णी आणि नीता जाधव, भास्कर रिकामे, दीपक नलावडे, मणेश मस्के, सुजित गोरे यांनी व्यवस्थापन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.