Chinchwad : पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात

एमपीसी न्यूज – अभंग शिक्षण क्रीडा व बहुउद्देशीय संस्था, स्टार बर्ड्स प्ले ग्रुप व पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. शनिवारी (दि. 1) हॅपी थॉट्स बिल्डिंग, नढे नगर, काळेवाडी येथे झालेल्या कार्यशाळेसाठी काळेवाडी मधील विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लहान मुले व त्यांच्या पालकांकडून तब्बल 111 गणपती तयार करण्यात आले.

वैभव घुगे म्हणाले, “आपण दरवर्षी बघतो की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती विसर्जन केल्यानंतर काही दिवसांपर्यंत या मूर्तीचे पाण्यामध्ये विघटन होत नाही. त्यामुळे नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. ही जनजागृती करत असताना केवळ इतरांना उपदेश न करता त्यासोबत स्वतः पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करायला हवी. पर्यावरण पूरक गणपतीची संकल्पना आपल्या कृतीतून समाजात रुजवावी. स्वतःपासून सुरुवात करून समाजापर्यंत पोहोचविणे हे या कार्यशाळेचे उद्धिष्ट आहे.

काळेवाडीतील नगरसेवक, नगरसेविका व नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन अभंग शिक्षण क्रीडा व बहुउद्देशीय संस्थेचे वैभव घुगे, प्रवीण अहिर, स्टार बर्ड्स प्ले ग्रुपचे प्रमुख नागराजन, शिक्षक व पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम यांनी केले. ग्राफिक डिझाईनर स्वप्नील भोंडवे आणि सौरभ घोगरे, निसर्गमित्रचे भास्कर रिकामे यांची मूर्ती घडवण्यासाठी मदत झाली. निहार थत्ते, अनिल घोडेकर, हृषिकेश तपशाळकर, निलेश सूर्यवंशी यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.