22.4 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

Chinchwad News : ‘ईडी’ सरकारने लोकशाहीचा मुडदा पाडला, खून केला – अजित पवार

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत.मुख्यमंत्री आणि बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आता तीनचा प्रभाग चारचा करायला निघाले आहेत. वाढलेल्या लोकसंख्येनुसार आम्ही नगरसेवकसंख्या वाढविली होती, ती कमी केली. तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्हायचे मग बाकीच्यांना प्रतिनिधीत्व का द्यायचे नाही? हा कुठला कारभार? ही कुठली लोकशाही? तुम्ही तर लोकशाहीचा मुडदा पाडला, खून केला, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (ईडी) सरकारवर केला.महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्यांप्रमाणे राज्याचे अधिकारही मुख्य सचिवांना द्या आणि तुम्ही दोघेही घरी बसावे.आमच्या सरकारने चुकीच्या कामात दोषी आढळलेल्या निलंबित केलेल्या चार अधिका-यांना या दोन टिकोजीरावांनी पुन्हा सेवेत घेतल्याचाही हल्लाही त्यांनी केला.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ हा मेळावा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आज (शनिवारी) पार पडला. कार्यकर्त्यांना पवार यांनी मार्गदर्शन केले.शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, श्याम लांडे, राहुल भोसले, पंकज भालेकर, विनोद नढे, फजल शेख आदी यावेळी उपस्थित होते.

”सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला आले नाही.सत्तांतर घडत असतात. सत्ता असली तरी हुरळून जाऊ नये आणि सत्ता गेली तरी नाऊमेद व्हायचे नाही.आपले काम करत राहिले पाहिजे असे” सांगत पवार म्हणाले, ”राज्यात चांगले चालत असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यातून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला.गेल्या एक महिन्यापासून राज्यात अवघ्या एका व्यक्तीचे मंत्रीमंडळ आहे.त्यांच्या जोडीला बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत.सरकार असून नसल्यासारखे आहे.राज्यात विविध घटना घडत आहेत.याकडे लक्ष द्यायला सरकारमध्ये कोणी नाही. मंत्रीमंडळ नसल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले आहेत.ही अवस्था राज्याची केली आहे”.

”महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या मुदती संपल्या आहेत. पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परंतु, निवडणुका घेत नाहीत. यांना फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणुका घ्यायच्या आहेत. नगरपालिकांमध्ये लोकांच्यातून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. मग, पिंपरी-चिंचवडमध्ये लोकांच्यातून महापौर, राज्यात लोकांमधून मुख्यमंत्री आणि देशातही लोकांमधूनच पंतप्रधान होऊ द्यावा. ठराविक ठिकाणी एक न्याय आणि तुमच्या हातात तिथे एक न्याय हे कसे चालेल. तुम्ही दुस-या पक्षातील मानसे बाजूला केली. वेगळा गट स्थापन करुन 145 चा आकडा गाठून तिथे वेगळ्या पद्धतीचा कारभार कसा चालेल? हे शाहु-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चालणार नाही. लोक आत्ता गप आहेत. पण, निवडणुका येऊ द्या, कुठे बटने दाबतील हे कळायचे नाही. लोकांनी काँग्रेसलाही बाजूला केले होते. जनतेच्या मनामध्ये आल्यानंतर जनता कोणालाही सत्तेतून खाली खेचते, हे लोकशाहीने सिद्ध केल्याचे”ही पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, मंत्रीमंडळ विस्ताराला काय अडचण आहे ते खुल्या मनाने सांगावे.40 लोकांना मंत्रीपदाचे गाजर दिल्याने आता देता येत नसल्याने विस्तार रखडला असला तर तसेही सांगावे. राज्याचे प्रशासन टप्प झाले आहे. हे योग्य नाही. यातून लवकर मार्ग निघेल अशी चिन्हे राज्यातील जनतेला दिसत नाहीत.’कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र’ आमचा असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. कितीही ‘हम दो काफी’ म्हणत असले तरी तुम्ही ‘मिस्टर इंडिया’ होऊ शकणार नाहीत. त्यामुळे हम दो हम दो बास झाले. आता मंत्रीमंडळ विस्तार करावा”.

वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर कसा होतोय, हे न समजायला जनता काही दुधखुळी नाही

”फोडाफोडीचे राजकारण जनतेला पठत नाही. छगन भुजबळ, नारायण राणे हे देखील शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर राणे यांनांही निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. किती काही असले तरी पक्षाची विचारधारा, पक्षाला मानणारा मतदार असतो. आता आदित्य ठाकरे यांच्या सभांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज्यात जे घडलेय, झाले आहे. ते जनतेला पटले नाही. अर्थमंत्री असताना मी राष्ट्रवादीला निधी दिल्याचा खोटा आरोप केला. ज्यांना जायचे होते, त्यांनी निमित्त शोधले.

मुख्यमंत्री व्हायचे होतो म्हणून तिकडे गेलो असे कसे सांगू शकतील. हे लोक मान्य करणार नाहीत. त्यामुळे इथे आमच्यावर अन्याय होतो. 100 आमदारांचा आकडा ठेवून अजित पवारांचे काम चालू होते म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असे सांगतात. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जाहीर सभेतील व्यासपीठावर राजीनामा देऊ केला होता. नाचता येईन अंगण वाकडे हा प्रकार आहे. वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर कसा होतोय हे समजायला जनता काही दुधखुळी नाही”, असेही पवार म्हणाले.

spot_img
Latest news
Related news