ED summons Varsha Raut : पुन्हा होणार वर्षा राऊत यांची चौकशी; 11 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा एकदा ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांना 11 जानेवारी रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वीही 29 डिसेंबर रोजी ईडीकडून नोटीस बजावून 4 जानेवारी रोजी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याचे समोर येत आहे.

वर्षा राऊत यांना पहिल्या वेळेस समन्स बजावण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी कोणाचेही नाव न घेता “आ देखें जरा किसमें कितना है दम, जमकर रखना कदम मेरे साथिया” तसेच ‘पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है’, अशा आाशयाचे ट्विट केले होते.

ईडीने वर्षा राऊत यांना 11 डिसेंबर रोजी नोटीस पाठवली होती. त्यावेळी त्या हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून दिले होते. परंतु वर्षा राऊत यांनी 28 डिसेंबरला ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर राहण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना 5 जानेवारीला हजर राहायचं होतं. परंतु त्या एक दिवस आधीच म्हणजेच 4 जानेवारीला दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या.

काय आहे हा पीएमसी बँक घोटाळा…
पीएमसी बँकेत बनावट खात्यांद्वारे एका विकासकाला शेकडो कोटी रुपये कर्ज दिल्याची बाब 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊ नये यासाठी आरबीआयने सप्टेंबर 2019 मध्ये निर्बंध घातले होते. हे निर्बंध मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. पीएमसी बँकला बुडवण्यात जी 44 मुख्य खाती होती, त्यापैकी 10 खाती एचडीआयएलची होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.