Editorial : ‘हतबल’ नेता, ‘रामभरोसे’ जनता!

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – कोणतेही युद्ध हे प्रथम मनात हरले जाते, नंतर ते रणांगणावर हरले जाते. म्हणजेच मनाने हार मानली की तुमची जिंकण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात येते, मग जिंकण्यासाठी हतबल होऊन केवळ दैवी चमत्काराची वाट पाहात बसावे लागते. कोणत्याही लढाईमध्ये सेनापती जोशात असतो, तोपर्यंत त्याचे सैन्यही त्वेषाने लढत असते, मात्र सेनापतीच ढेपाळला, खचला, हतबल झाला तर त्याचं सैन्यही शस्त्र खाली ठेवतं. मग त्या लढाईचा निकाल काय लागणार, हे एखादं लहान मूल देखील सांगू शकेल.

सध्या संपूर्ण जगात एकच युद्ध सुरू आहे. ते म्हणजे कोरोना विरुद्ध मानव. जवळजवळ सव्वा वर्ष हे युद्ध सुरू आहे. आणखी किती दिवस हे युद्ध चालणार माहीत नाही. तरी देखील आपण सर्वजण न थकता, हतबल न होता, निकराची झुंज देत आहोत. पण दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पिंपरी-चिंचवडमधील एका दमदार, शक्तीशाली, बाहुबली, पैलवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्याची ती पोस्ट वाचली आणि काही काळ आम्हीही हतबल झालो…

बरोबर ओळखलंत भोसरीचे आमदार व पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या नावाने ‘मी हतबल झालोय…’  या मथळ्याची पोस्ट वाचून आश्चर्याचा धक्का बसला. कदाचित महेशदादांच्या एखाद्या कार्यकर्त्याने  भावनेच्या भरात ती पोस्ट टाकली असावी, अशी आम्ही आमच्या मनाची समजूत काढली. पण दोन-तीन दिवस झाले तरी ती पोस्ट तशीच राहिली. महेशदादांनी त्या पोस्टवर काहीही भाष्य केलं नाही. याचा अर्थ त्यांच्या सहमतीनेच ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली, असे समजण्यास आता हरकत नाही.

महेशदादा हा पैलवान गडी असल्याने कोरोनाच्या आखाड्याला तो पाठ दाखवील, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. कोरोनाच्या युद्धात लोकांसाठी लढताना त्यांना स्वतःला कोरोनाची लागण झाली. तेव्हाचे महेशदादा आम्हाला आठवले. त्यांनी ती कोरोनाची लढाई जिंकलीच शिवाय समस्त शहरवासीयांना कोरोना विरुद्ध लढण्यासाठी नवीन बळ दिले. महेशदादांचा हाच लढाऊ बाणा तरुणांना आकर्षित करून घेतो. शरीराने बलाढ्य दिसणाऱ्या महेशदादांची एक मोठी कमजोरी आहे. ते खूप हळवे आहेत. अनेकवेळा ते भावूक झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे.

भोसरीचे आमदार एवढीच महेशदादांची ओळख नाही. ते महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष देखील आहेत. राज्यात नसली तरी केंद्रात त्यांच्याच पक्षाची सत्ता आहे. महापालिकेत त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींना देखील स्वतःच्या मताप्रमाणे निर्णय घ्यायला भाग पाडणारा शक्तीशाली नेता म्हणून ते ओळखले जातात. त्यांना आणि त्यांच्या टीमला हतबल झाल्यासारखं कसं वाटू शकतं? खरोखरच परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली आहे का?

देशातील परिस्थिती गंभीर आहे, हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्य करतात. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करतात. पण दोघेही जनतेला धीर देत लोकांचे मनोबल कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच वेळी आपल्या शहराचे नेतृत्व करणारे महेशदादा मात्र हतबलता व्यक्त करीत लोकांना ‘रामभरोसे’ सोडणार असतील, तर त्यासारखे शहराचे दुसरे दुर्दैव नाही, असेच खेदाने नमूद करावे लागेल.

लोकांना हवी असणारी एखादी गोष्ट स्वतः मिळवता येत नाही आणि एखादी व्यक्ती त्यांना ती मिळवून देईल, असा विश्वास त्यांना वाटतो, त्यावेळी नेतृत्वाचा उदय होतो. हव्या असलेल्या गोष्टी महेशदादा आपल्याला मिळवून देतील, अशी आशा वाटल्यामुळेच महेशदादांचे नेतृत्व बहरले. महेशदादांवर लोकांनी नेतृत्व लादलेले नाही. महेशदादांनी वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेने ते मिळविले आहे. अनेक मोठे-मोठे प्रकल्प व उपक्रम राबवून यांनी स्वतःच लोकांच्या अपेक्षांचे ओझे वाढवून घेतले. चाणक्य आणि मॅनेजमेंट गुरूंची फौज पदरी बाळगणारा हा नेता राज्य पातळीवर आपला ठसा उमटवेल, अशी खात्री त्यांच्या समर्थकांना वाटू लागली. पण ऐन संकटकाळात हतबलता व्यक्त करीत महेशदादांनी त्यांच्या सर्व चाहत्यांना निराश केले.

सामान्य आणि चांगल्या परिस्थितीत काम कोणीही करून दाखवतो. प्रतिकूल परिस्थिती, अपुरी साधनसंपत्ती, अपुरे मनुष्यबळ असतानाही त्यावर मात करतो, तो खरा नेता असतो. छत्रपती शिवाजी महाराज कधीही हतबल झाले नाहीत, म्हणूनच ते आजही वंदनीय आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन महेशदादा काम करीत असतील तर त्यांना हतबल व्हायचा अधिकार आहे का?

मी हतबल झालोय…

‘व्हेंटिलेटर बेड आणि रेमडेसिवीरचा तुटवडा भयंकर झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी सुरु केलेल्या कंट्रोल रूममधून प्रतिसाद मिळत नाही, अशा शेकडो तक्रारी मला सोशल मीडिया आणि कार्यालयात येत आहेत. रुग्णालय प्रशासन जबाबदारी झटकत आहे. मेडिकल स्टोअर्समध्ये स्टॉक नाही, असे उत्तर मिळते. कोरोनाच्या महासंकटाचा सामना करण्यासाठी आपण सर्वजण अहोरात्र कष्ट करीत आहोत. बेड, ऑक्सिजन बेड , व्हॅटिलेटर बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन, रुग्णवाहिका आदींसाठी माझ्या कार्यालय प्रतिनिधींकडे दिवसभरात शेकडो फोन येतात. पण, मेट्रो सीटीमध्येच रेमडेसिवीर आणि बेडची कमतरता आहे तिथे ग्रामीण भागातील परिस्थिती कशी असेल? याचा विचारसुद्धा मनाला अस्वस्थ करणारा आहे. सर्वच लोकांना सुविधा व मदत इच्छा असूनही देता येत नाही. मी आणि माझी टीम अक्षरशः हतबल झालो आहोत. आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्या!’ असं महेशदादांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

महेशदादा स्वतः आमदार आहेत. केंद्रात आणि महापालिकेत सत्ता असलेल्या पक्षाचे शहराचे ते अध्यक्ष आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन आणि रुग्णांना बेड मिळवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे. कोठून मिळवायचे, कसे मिळवायचे, त्यासाठी निधी कसा उपलब्ध करून द्यायचा, हा प्रश्न त्यांचा आहे. कोट्यवधी रुपये खर्चून ‘इंद्रायणी थडी’ सारखे भव्य-दिव्य उपक्रम यशस्वी करून दाखविणाऱ्या महेशदादा आणि त्यांच्या टीमला आम्ही हे समजावून सांगणे म्हणजे ‘लहान तोंडी मोठा घास’ ठरेल.

रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीचा विषय त्यांची सत्ता असलेल्या महापालिकेतील स्थायी समिती कित्येक दिवस तहकूब ठेवते, तेव्हाही महेशदादा हतबल आहेत का, हे त्यांनी जाहीर करून टाकावे. व्हेंटीलेटर खरेदीच्या विषयाचा चेंडू  आयुक्तांच्या कोर्टात ढकलून त्यांना मोकळे होता येईल का? राज्यात नसली तरी केंद्रात त्यांच्याच पक्षाची सत्ता असताना केंद्राकडून काही विशेष मदत पदरात पाडून घेण्यात कोणती हतबलता होती? महेशदादा खरंच हतबल आहेत का जबाबदारी टाळण्यासाठी ते हतबलतेचं ढोंग करीत आहे, हे खरे प्रश्न आहेत.

कोरोनाच्या संकट काळात शहराला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे महेशदादांनी अवसानघातकीपणा सोडावा आणि पुन्हा खंबीरपणे लढण्यासाठी उभे राहावे. ‘महेशभरोसे’ जनतेला ‘रामभरोसे’ सोडू नये. जनतेचा ‘भरोसा’ एकदा तुटला तर पुन्हा मिळवता येणार नाही. प्रभू रामचंद्रच कोरोनाच्या संकटातून जनतेचे रक्षण करणार असतील तर मग इतरांची गरजच उरत नाही. महेशदादा सूज्ञ आहेत. शहराची गरज ओळखून त्यांनी संकटकाळात स्वतःचे नेतृत्व सिद्ध करावे, एवढीच माफक अपेक्षा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.