Editorial: चला जिंकूयात ‘कोरोना’विरुद्धचे महायुद्ध!

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – कोणताही जीव सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर तो मृत्यूला! सगळ्यांची अखंड धडपड चालू असते ती जगण्यासाठी, अधिक चांगलं जगता यावं यासाठी. पण गेल्या काही दिवसांत काही लोक असे काही वागत आहेत की, जणू स्वतःच्या जीवावर उदार झाले आहेत. त्याच बरोबर इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. एखाद्याने आत्महत्या करायचं ठरवलंच तर त्याला कोणीही वाचवू शकत नाही, पण त्याला इतर कोणाचाही जीव बरोबर घेऊन जाण्याचा काहीही अधिकार नाही.

चीनमध्ये प्रथम आढळलेल्या आणि पसरलेल्या कोरोना विषाणूने चीनच्या सीमा ओलांडून जगभर थैमान घालायला कधी सुरूवात केली, हे कोणालाच कळलं नाही. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला जगद्व्यापी साथ म्हणून जाहीर केल्यानंतरही आपण पुरेसे सावध झालेलो दिसत नाही. आता तर कोरोना विषाणू तुमच्या-आमच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहचला आहे. तरी देखील समाजातील मोठा वर्ग अजूनही गाफील आहे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

हा लेख लिहून पूर्ण होईपर्यंत कोरोनाने जगभरात घेतलेल्या एकूण बळींची संख्या 9,840 होती. म्हणजेच पाच आकडी संख्या फार दूर नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात आतापर्यंत तब्बल 2 लाख 34 हजार 073 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. हा खरोखरच छातीत धडकी भरविणारा आकडा आहे. भारतात आतापर्यंत 258 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून चारजणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 64 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

आता आपल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील परिस्थितीवर नजर टाकूयात! शहरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 23 वर जाऊन पोहचला आहे. त्यापैकी पुण्यात 11 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 12 रुग्ण आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून एक महिला वगळता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

आग शेजारच्या घरापर्यंत येऊन पोहचली आहे. अशा परिस्थितीत आपले घर आणि आपला जीव वाचविण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही तरीही गाफील राहिलात तर विनाश अटळ आहे. कोरोना या विषाणूवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यात अजून तरी शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. शत्रूला कसा संपवायचा हे माहीतच नसेल तर त्याला रोखून स्वतःला वाचविणे, एवढीच रणनीती अवलंबावी लागते. माहिती, संशोधन आणि नवीन शोध याद्वारे कोरोनाला रोखणे आणि संपविणे शक्य होणार आहे.

कोरोना हा जीवघेणा विषाणू नाही, असे सांगितले जात असतानाच कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एका जागतिक महायुद्धातील मृतांचा आकडा पार करतो की काय, अशी परिस्थिती आहे. हे कोरोनाचे जागतिक महायुद्ध जिंकायचे असेल तर आपल्या सर्वांना अत्यंत सावधपणे, एकदिलाने, पूर्ण शक्तीनिशी व उपलब्ध साधनसामग्रीनिशी लढावे लागणार आहे.

कोरोनाचा संसर्ग एका व्यक्तींकडून दुसऱ्याला व्यक्तीला होतो. कोरोना झालेली व्यक्ती योग्य निदान व योग्य उपचारांनी बरी होऊ शकते. त्यामुळे सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दोन व्यक्तींनी किमान तीन फुटांचे राखणे गरजेचे आहे. सामाजात त्या विषयी जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनाविषयी अधिकृत माहिती मिळवा, अफवा व गैरसमजापासून दूर राहा. काही दिवस गर्दीपासून दूर राहा, स्वच्छता राखा व योग्य ती काळजी घ्या, कोरोनाला हरविणे सहज शक्य आहे.

प्रत्येकाने कोरोना विरोधातील महायुद्धातील जवान बनावे. स्वयंशिस्त आणि आदेशाचे काटेकोर पालन प्रत्येकाने केले तर लढाईत विजय आपलाच आहे. भारतीयांमध्ये निसर्गत: रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. तरी देखील गाफील न राहता लढ्यात सहभागी व्हा. एक निष्काळजी क्षण खूप मोठे नुकसान घडवू शकतो. जवानांप्रमाणे सदैव सतर्क राहून जिंकण्याच्या जिद्दीने लढत राहिल्यास शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपण जिंकू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे 22 मार्च 2020 रोजी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत. चेन मार्केटींग करणाऱ्या अनेक कंपन्या बंद पडल्या त्या साखळी तुटल्यामुळे! कोरोना संसर्गाची साखळी तोडली की आपोआप कोरोनाला गाशा गुंडाळावा लागणार आहे.

जीवन हे खूप सुंदर आहे. तुम्हा-आम्हा सगळ्यांना त्याचा आनंद लुटायचा आहे. पण त्यासाठी जिवंत राहणं महत्त्वाचं आहे. ‘साला एक मच्छर….’ हा नाना पाटेकर यांचा डायलॉग आठवतो ना? तसंच ‘साला एक कोरोना…’ असा नवा डायलॉग म्हणायची पाळी आपल्यावर येणार नाही.  भारताने आतापर्यंत अनेक आजार, साथी पचविल्या आहेत. कोरोनाविरुद्धचे महायुद्ध देखील आपण नक्कीच जिंकणार आहोत. तेव्हा सज्ज होऊयात कोरोनावर विजय मिळवूयात!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.