Pune : शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते : अॅड. जैन

एमपीसी न्यूज – “पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले. परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल. पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच आपली परिस्थिती बदलण्याचे मुख्य साधन आहे,” असे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांनी सांगितले.

बोपोडी येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमा वेळी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर,  अशोक शिरोळे,  अशोक कांबळे, महेश कर्पे ,ऍड. आयुब शेख, संजय सोनवणे, बाबुराव घाडगे, नगरसेविका सुनिता वाडेकर, प्रकाश ढोरे आदी उपस्थित होते.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आनंद कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत आनंद कांबळे यांच्या स्मरणार्थ पुणे शहरातील पूरग्रस्त व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. एकूण १२०० विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

अॅड. एस. के. जैन म्हणाले, “चांगले शिक्षण घेऊन आपण उत्तम नागरिक बनले पाहिजे. गरीब-गरजू विद्यार्थ्यांनी शिकावे यासाठी समाज सतत पुढे येत असतो. प्रसारक मंडळींच्या माध्यमातूनही अनेक गरजू मुलांना शिक्षण दिले जात आहे. झोपडपट्टीतील, वंचित घटकांतील नागरिकांसाठी वाडेकर दाम्पत्य करीत असलेले काम आदर्शवत आहे. तुमच्या प्रत्येक संकटात ते धावून येतात, ही चांगली गोष्ट आहे.”

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “पुराच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. वाडेकर यांच्यासह या भागातील नगरसेवकांनी तुम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. राहण्याखाण्याची व्यवस्था केली. तसेच प्रशासनाकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले.” आंबेडकर सांस्कृतिक समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे होतात.

पूरग्रस्तांना सावरण्यासाठी त्यांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे अशोक शिरोळे यांनी नमूद केले. महेश कर्पे यांनीही या शालेय साहित्य वाटपाच्या उपक्रमाचे कौतुक करत मुलांना शुभेच्छा दिल्या. परशुराम वाडेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.