Pimpri : शालेय पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा सुरु करण्याची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी 

श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी केली मागणी 

एमपीसी न्यूज – ‘श्री साईबाबांची महासमाधी शताब्दी महोत्सव’ यंदा साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त धर्मनिरपेक्षतेची शिकवण देणा-या श्री साई बाबांविषयी शालेय पाठ्यपुस्तकात धडा सुरु करण्याची मागणी, श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

याबाबात राज्याचे शालेय, उच्चतंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना नेलगे यांनी निवेदन दिले. यावेळी माजी विश्वस्त डी.एच.इनामदार, श्री शिर्डी साईबाबा संस्थानचे वसंतराव पिंपळे उपस्थित होते. निवेदनात नेलगे यांनी म्हटले आहे की, श्री साई बाबांसाठी हिंदू-मुस्लिम, सिख-इलाईसह सर्व धर्मीय लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. रंजल्या-गांजलेल्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी मदत करीत असत. त्यामुळेच ते भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहेत. त्यांच्या ‘धर्म निरपेक्षता आणि मानवता’ या व इतर शिकवणीची सध्याच्या काळात खूप गरज आहे.

जगभरातील अनेक साधू-संतांची माहिती शालेय पुस्तकांमध्ये आलेली आहे. परंतु, श्री शिर्डी साईबाबा यांनी सर्वधर्म समभाव ही शिकवण संपूर्ण जगाला दिली. महासमाधी शताब्दी निमित्त  साई बाबांविषयी माहिती असलेले धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा. असा धडा सुरु झाल्यास शालेय विद्यार्थ्यांवर ‘धर्म निरपेक्षता आणि मानवता’ यांच्यावर लहान वयात चांगले संस्कार होतील. या धड्यामुळे अखंड भारतासाठी नक्कीच फायदा होईल.  त्यामुळे राज्य सरकारने योग्य ते निर्णय घेऊन नवीन शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक व माध्यमिक पाठ्यपुस्तकात साई बाबांविषयी धडा समाविष्ट करावा, अशी मागणी नेलगे यांनी निवेदनातून केली आहे. तसेच आवश्यकता असल्यास योग्य तो धडा तयार करुन देण्याची देखील तयारी नेलगे यांनी दर्शविली आहे.

त्याचबरोबर आळंदी रोडवरील वडमुखवाडी येथील साई मंदिरात  श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त 10 ते 19 ऑक्टोंबर दरम्यान होणा-या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची विनंती देखील शिक्षणमंत्री तावडे यांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.