देशाची क्षमता वाढण्यात शैक्षणिक क्षेत्र देऊ शकते योगदान- लेफ्टनंट जनरल पीजेएस पन्नू

भारती विद्यापीठातील व्याख्यानाला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- आपण विकसनशील देश असल्याने जगातील सगळेच प्रगत तंत्रज्ञान विकत घेऊ शकत नाही, अशा वेळी विज्ञान-तंत्रज्ञानात संशोधन करून देशाची क्षमता वाढविण्यात उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र योगदान देऊ शकते, महासत्ता व्हायचे असेल तर कोणीही आपल्याला मदतीला येणार नाही ,आपली मदत आपल्यालाच करावी लागेल ,प्रगत तंत्रज्ञान आणि सक्षम मनुष्यबळ निर्मितीत उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राने योगदान द्यावे’,असे प्रतिपादन इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल पीजेएस पन्नू यांनी केले .

भारती अभिमत विद्यापीठातर्फे शनिवारी दुपारी लेफ्टनंट जनरल पीजेएस पन्नू यांचे व्याख्यान धनकवडी कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आले होते . ‘प्रगत भारताच्या जडणघडणीत उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राची भूमिका ‘ या विषयावरील व्याख्यानात त्यांनी ‘भारतासमोरील समस्या ,औद्योगिकीकरण ,शिक्षण क्षेत्राचे संभाव्य योगदान ‘ अशा मुद्द्यांचा परामर्श घेतला . या व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम, डॉ डी एस मणी, निवृत्त कर्नल संभाजी पाटील, कर्नल श्री जयराम ,डॉ आनंद भालेराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते . लेफ्टनंट जनरल पीजेएस पन्नू यांचा सत्कार डॉ शिवाजीराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला .

लेफ्टनंट जनरल पीजेएस पन्नू म्हणाले , “सैन्यदल प्रतिकूल परिस्थितीतही सदैव कार्यरत असते . आपण सक्षम असू तरच स्वतंत्र राहू शकतो ,महासत्ता व्हायचे असेल तर कोणीही आपल्याला मदतीला येणार नाही, आपली मदत आपल्यालाच करावी लागेल . सायबर हल्ल्यासारखे अदृश्य शत्रू वाढल्याने युद्धाचे आयाम बदलत चालले आहेत . व्यापार ,सायबर हल्ले, तंत्रज्ञानाचे हल्ले अशा कोणत्याही मार्गाने युद्ध सुरूच असते. म्हणून आपल्या क्षमता वृद्धीचे उपाय सतत शोधत राहावे लागतात. प्रगत तंत्रज्ञान घ्यायला आपण विकसनशील देश असल्याने आपल्याकडे निधी कमी पडू शकतो ,उद्योगांना प्रगत तंत्रज्ञानाअभावी व्यवसाय वृद्धी करता येत नाही आणि देशाचे सकल उत्पन्न वाढविता येत नाही ,परिणामतः पुन्हा आपण निधी उभारणीत कमी पडतो, हे दुष्टचक्र भेदण्यासाठी नाविन्यपूर्ण विज्ञान तंत्रज्ञानाचे संशोधन करून उद्योग आणि शिक्षण क्षेत्र देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकते.

आपल्याला आपले तंत्रज्ञान स्वतःच निर्माण करावे लागेल त्यासाठी सक्षम मनुष्यबळ निर्मितीकडे शिक्षण क्षेत्राने लक्ष द्यावे .

शिक्षक हे चांगला मार्ग दाखवू शकतात ,आणि चांगला मार्ग दाखविणाराच नेता बनू शकतो .त्यामुळे देशाच्या नेतृत्व घडणीतही शिक्षण क्षेत्र चांगली भूमिका बजावत असून भारती विद्यापीठाचे त्यात महत्वाचे योगदान आहे . प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातील योद्धा सैनिक असतो कारण त्याच्या हृदयात देशप्रेम धगधगत असते असे सांगून श्री पन्नू म्हणाले ,’केवळ सीमेवरील युद्धाकडे लक्ष देऊन चालणार नाही तर परिसर स्वच्छ राखणे ,पृथ्वीची काळजी घेणे, पर्यावरण जपणे ,ऊर्जा वाढवणे ,पाण्याची बचत याकडेही प्रगत भारतीय नागरिकाना एकत्र येऊन लक्ष द्यावे लागेल .

पन्नू यांनी विद्यार्थी, प्राद्यापकांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.

भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव यांनी आभार मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.