Mumbai news: विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा देता येईल यासाठी प्रयत्न – उदय सामंत

Efforts are being made to allow students to take the exam from home- Uday Samant

एमपीसी न्यूज – कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर न जाता घरी बसूनच परीक्षा देता यावी अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.

आज मंत्रालयात मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत झूमच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक संपन्न झाली.

सामंत म्हणाले, विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी काळजी करू नये.

या परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व विद्यापीठ परीक्षेचे आयोजन करून निकाल जाहीर करतील असेही सामंत यांनी सांगितले.

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी आणि ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवरील कोविड-१९ चा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांनी आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त दि. १० नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सामंत यांनी यावेळी केल्या.

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता विधी व न्याय विभाग आणि ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल असेही सामंत यांनी संगितले.

बैठकीत परीक्षा किती तारखेपर्यंत घेऊ शकतो, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, परीक्षेची तारीख किती असावी, निकालाची तारीख किती असावी, परीक्षा पद्धत कशी असेल,अशा विविध विषयांवर कुलगुरू यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

परीक्षा पद्धती संदर्भात गठित केलेल्या समितीची बैठक बुधवार दिनांक २ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी होईल त्यानंतर उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५:०० वाजता बैठक होईल.

या बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी सहभागी होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.