Pimpri : आठ नगरसेवकांमुळे भाजपची प्रतिमा डागाळली, निवडणुकीत बसला फटका

यापुढे पक्षाविरोधात बोलल्यास थेट निलंबनाची कारवाई, आमदारांचा इशारा 

एमपीसी न्यूज – भाजपचे आठ नगरसेवक सातत्याने पक्षाच्या विरोधात बोलतात. पत्रके काढतात, नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे शहरात पक्षाची प्रतिमा डागळली आहे. त्याचा गैरफायदा विरोधकांनी घेतला. विधानसभा निवडणुकीत त्याचा पक्षाला फटका बसला आहे. यापुढे पक्षाविरोधात बोलल्यास थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी नगरसेवकांना दिला. तसेच भोसरीत मताधिक्य वाढले. पण, चिंचवडमध्ये मताधिक्य कमी झाल्याचेही मान्य करण्यात आले.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी पहिल्यांदाच भाजप नगरसेवकांची आज (गुरुवारी) महापालिकेत बैठक घेतली. बैठकीला सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. आमदारपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल जगताप आणि लांडगे यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी आमदारांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. भोसरीत मताधिक्य वाढले. पण, चिंचवडमध्ये मताधिक्य कमी झाले. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. आपण निवांत निवडणूक लढलो होतो, असे सांगण्यात आले.

आमची निवडणूक झाली आहे. महापालिकेत 2022 मध्ये सत्ता आणायची असेल तर आत्तापासूनच कामाला लागले पाहिजे. नगरसेवकांनी आपल्या चुका दुरुस्त करुन कामाला लागावे. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नामुळे भाजप बॅकफूटवर आले आहे. त्याच्यामुळे देखील मतावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर, त्याच्या कामाकडे विशेष लक्ष देण्यात यावे. अनधिकृत बांधकाम होऊ देऊ नका. त्यामुळे शहराचा बकालपण वाढत आहे. परवानगीनेच बांधकामे होऊ द्यावीत, अशा सूचनाही आमदारांनी नगरसेवकांना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like