Chakan : जन्मदात्या पित्याकडून आठ महिन्याच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत टाकून खून!

पत्नीशी भांडण झाल्याचे निमित्त; नाणेकरवाडीतील घटना 

एमपीसी न्यूज – पत्नीशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून जन्मदात्या पित्याने आठ महिन्याच्या मुलाचा पाण्यात टाकीत टाकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाणेकरवाडी (चाकण, ता. खेड, जि.पुणे) येथे शुक्रवारी (दि.१९) सकाळी सात वाजता उघडकीस आला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी नेपाळी पित्यावर भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास  ताब्यात घेतले आहे. 

साहिल चक्र उर्फ राजू सुनार (वय ८ महिने, सध्या रा. ज्योतिबा नगर, नाणेकरवाडी, ता. खेड, मूळ रा. नेपाळ), असे खून झालेल्या चिमुरड्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील चक्र उर्फ राजू सुरत सुनार (वय २४ वर्षे, सध्या रा. ज्योतिबा नगर, नाणेकरवाडी, ता. खेड, मूळ रा. नेपाळ) यास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी प्रवीण बब्रुवान झुंजार (वय २९, रा. ज्योतिबा नगर, नाणेकरवाडी, ता. खेड, मूळ रा.  कवठळी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे.

घटनास्थळी पोलीस उपयुक्त स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार आदी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी भेटी देऊन पाहणी केली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.