Central Government : चुकीची माहिती पसरविल्याबद्दल केंद्र सरकारने घातली आठ यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी

एमपीसी न्यूज – माहिती तंत्रज्ञान नियम 2021 नुसार देण्यात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीतील अधिकारांचा वापर करीत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने युट्यूबवरील आठ वृत्तवाहिन्या आणि एक फेसबुक खाते बंद करण्यासाठी तसेच फेसबुकवरील दोन पोस्ट हटविण्यासाठी 16 रोजी आदेश जारी केले. बंदी घातलेल्या या यू ट्युब वाहिन्यांची एकुण प्रेक्षक संख्या 114 कोटींहून अधिक होती. या वाहिन्यांसाठी 85 लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी ग्राहक म्हणून नोंदणी केली होती.

भारतातील काही यूट्यूब वाहिन्यांव्दारे प्रसारीत झालेल्या माहितीतून विविध धार्मिक समुदायांच्या सदस्यांमध्ये व्देष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.बंदी घातलेल्या यू ट्यूब वाहिन्यांवरील विविध व्हिडीओमध्ये चुकीचे दावे करण्यात आले होते. भारतीय सशस्त्र दले, जम्मू काश्मीर आदींबाबत खोट्या बातम्या प्रसारीत करण्यासाठी देखील या यू ट्यूब वाहिन्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. या बातम्यांचा मजकूर पुर्ण चुकीचा तसेच देशाची राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताचे परराष्ट्रांशी असलेले मैत्रीपुर्ण संबंध यांच्या दृष्टीकोनातून संवेदनशील असल्याचे आढळून आले आहे.

केंद्रीय मंत्रालयाने बंदी घातलेल्या वाहिन्या भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, देशाची सुरक्षितता, भारताचे परराष्ट्रांशी असलेले मैत्रीपुर्ण संबंध आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या दृष्टीने हानिकारक मजकूर प्रसारीत करत असल्याचे आढळले आहे.परिणामी,हा प्रकार माहीती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 69 अ च्या कक्षेत येत असल्यामुळे या वाहिन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.