मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Eknath Shinde : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना उद्धव ठाकरे यांना लाज वाटली नाही का, एकनाथ शिंदे यांचा पलटवार

एमपीसी न्यूज – बाळासाहेबांचे विचार तोडून-मोडून तुम्ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी तुम्हाला लाज वाटली नाही का वाटली, असा सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बीकेसी मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. ठाकरे यांनी आपली संभावना कटप्पा अशी केली, पण कटप्पा हा प्रामाणिक होता, स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता, असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला.

ठाकरे यांचे शिवतीर्थावरील भाषण झाल्यानंतर शिंदे यांचे बीकेसी मैदानावरील भाषण झाले. त्यामुळे ठाकरे यांच्या भाषणाला उत्तर देण्याची संधी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली. ठाकरे कुटुंबातील जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे व निहार ठाकरे यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात व्यासपीठावर हजेरी लावली.

“लाज तर तुम्हाला वाटायला हवी होती, बाळासाहेबांचे विचार तोडून-मोडून मुख्यमंत्रिपदाची शपथ तुम्ही घेतली. त्यावेळी या आमदारांनी विरोध केला होता’, असा दावा शिंदे यांनी केला. नारायण राणे म्हणाले होते की, बाळासाहेब असते तर हे मुख्यमंत्री झालेच नसते, या वाक्याची शिंदे (Eknath Shinde) यांनी आठवण करून दिली.

उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या मालमत्तेचे वारसदार आहेत तर आपण त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे शिंदे यांनी सुनावले. एकनाथ शिंदे याने जेवढा त्याग केला आहे तो यांना समजलाच नाही. माझा त्याग काय आहे आणि तुमचा त्याग काय आहे, असा सवाल त्यांनी केला.

आनंद दिघे यांच्या निधनानंतर आपण उद्धव ठाकरे यांना प्रथम भेटलो, तेव्हा त्यांनी दिघे साहेबांच्या कार्याविषयी बोलण्याऐवजी त्यांच्या मालमत्तेविषयी आपल्याकडे चौकशी केली, असा जाहीर गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत कोणालाही मोठा होऊ दिला नाही. अनेक कर्तबगार नेत्यांचे पाय उद्धव ठाकरे यांनी कापले, असा आरोप शिंदे यांनी केला.

शिंदे म्हणाले की, “आम्ही कोणत्याही शिवसैनिकाला त्रास दिला नाही. आम्हाला कुणावरही अशा प्रकारचा अन्याय करुन प्रवेश करुन घ्यायचा नाही हे मी जाहीरपणे सांगतो.

निष्ठावंत शिवसैनिकांनी सांगावं, पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण आता इमोशनल ब्लॅकमेल करता येणार नाही, अशा पद्धतीने पक्ष वाढवता येणार नाही. आता राहिलेलेही आमच्यासोबत येतील, असे शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

“उद्धव ठाकरे यांनी भाषणात माझ्या छोट्या नातवावर देखील टीका केली, पण त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालंय, हे लक्षात ठेवा”, असा टोला शिंदे यांनी लगावला. कोणावर टीका करायची, काय टीका करायची हे पण समजत नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे ते म्हणाले. आमचे कोथळे काढण्याची भाषा करता,आयुष्यात कुणाला एक चापट तरी मारलीय का, असा सवाल शिंदे यांनी केला.

Uddhav Thackeray : …हा तर पन्नास खोक्यांचा खोकासूर; उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांच्यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, असा आरोप करीत शिंदे (Eknath Shinde) यांनी केला. “माझं कुटुंब, माझी जबाबदारी ही घोषणा त्यांनी केली त्याचवेळी माझ्या लक्षात आलं. ‘हम दो, हमारे दो ‘ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. परिवाराच्या पलिकडे जाऊन कुणाचाही विचार केला नाही.,” अशी टिप्पणीही शिंदे यांनी केली.

Latest news
Related news