Ekta Wakunj : पाच सुवर्ण पदक जिंकलेल्या एकताच्या वेटलिफ्टिंगच्या स्वप्नांना हवा आर्थिक हातभार!

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका खेड्यातील शेतकऱ्याची मुलगी (Ekta Wakunj) वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करत आहे आणि राष्ट्रीय स्पर्धांसाठी स्वत:ला तयार करत आहे. पण आर्थिक समस्या हा तिच्या स्वप्नांच्या मार्गातील प्रमुख अडथळ्यांपैकी एक आहे.

खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे राहणारी एकता सोमनाथ वाकुंज ही वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करत आहे. लहानपणी तिला धावण्याची आवड होती. गावातली काही मुलं वेटलिफ्टिंगचा सराव करत होती. त्यांनीही एकताला त्यासाठी आग्रह केला. केवळ छंद म्हणून वेटलिफ्टिंगचा सराव करत असताना तिला स्पर्धेची तळमळ होती. यातून एकताने राज्यस्तरावर आतापर्यंत पाच सुवर्णपदके जिंकली असून भुवनेश्वर येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या स्पर्धेतही तिने सहभाग घेतला आहे.

एकता सध्या खेडच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षात आहे. यापूर्वी तिला अमोल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले होते. या खेळातील पुढील प्रशिक्षणासाठी ती सध्या सांगली येथे संतोष सिंहासानी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

Infosys : ‘कलरलेस’मधून नृत्य, अभिनय, कलेचे प्रभावी सादरीकरण

एका वृत्तपत्राशी बोलताना एकता (Ekta Wakunj) म्हणाली, की “मला या खेळात राष्ट्रकुल स्पर्धेत पोहोचायचे आहे. मात्र, कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे मी माझ्या व्यायामासोबतच योग्य आहाराचे पालन करू शकत नाही.”

तिच्या कुटुंबात दोन भावांसह आई-वडील आहेत. एकताने सांगितले की तिचे आई-वडील तिच्या मोठ्या भावासह शेती करतात; तर लहान भाऊ शिक्षण घेत आहे. “मला वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करायचे आहे आणि त्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज आहे,” असे एकताने सांगितले.

शीख हेल्पलाइन फाऊंडेशनचे संस्थापक राज सिंग यांनी सांगितले की, “एकतासारख्या खेळाडूंना अधिक ओळखीची गरज आहे. ग्रामीण भागात खूप टॅलेंट आहे पण संधीचा अभाव आणि आर्थिक समस्यांमुळे फार कमी लोक त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात.

राज सिंग हे स्वतः भारताचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी सांगितले की, “सांगलीमध्ये तिला योग्य आहार आणि व्यायामासह प्रशिक्षण देणे हा मुख्य हेतू आहे. यासाठी आम्हाला 25,000 ते 50,000 रुपये मासिक हवे आहेत. त्याचसाठी शीख हेल्पलाइन फाऊंडेशन एकताला तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे.”

एकताला मदत करण्यासाठी बँक तपशील:

नाव : एकता सोमनाथ वाळूंज

शाखा: पिंपरी बुद्रुक (1074)

बँकेचे नाव: बँक ऑफ महाराष्ट्र

खाते क्रमांक : 68026600924

IFSC कोड: MAHB0001074

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.