Pimpri : लोकप्रियतेबरोबरच कामगिरीत सरस ठरलेल्या बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवा – आदित्य ठाकरे (व्हिडिओ)

पिंपरीत आदित्य संवादला तरुणाईचा मोठा प्रतिसाद 

एमपीसी न्यूज – अनेक खासदार लोकप्रिय असतात. मात्र, काम करणारे नसतात. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे लोकप्रियतेबरोबरच कामगिरीत देखील सरस ठरले आहेत.  सलग पाचवेळा संसदरत्न पुरस्कार मिळविणे सोपे नाही. पंतप्रधान, मंत्री, विरोधीपक्षनेते संसदेत असतात. या दिग्गज नेत्यांमधून बारणे यांना सलग पाचवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला असून खरोखरच बारणे यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. मावळचा आवाज संसदेत उठविण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवा, असे आवाहन शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 

पिंपरीतील चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी (दि.24) ‘आदित्य संवाद’ हा कार्यक्रम झाला. तरुणांच्या प्रश्नांना ठाकरे यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. खासदारांना पुन्हा का निवडून द्यावे, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी बारणे यांची कामगिरी सांगत. त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, रघुनाथ कुचिक, आमदार गौतम चाबुकस्वार, महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक निलेश बारणे, जितेंद्र ननावरे उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मावळ मतदारसंघ खूप मोठा मतदारसंघ असून रायगड आणि पुणे जिल्ह्यात विभागला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती मोठी आहे. शहर आणि गावे असलेला हा मतदारसंघ आहे. मतदारसंघात प्रवास करायचा म्हटले तरी आपण थकतो. खासदारांना किती प्रवास करावा लागत असेल. खासदाराला 24 तास 7 दिवस काम करावे लागते. वर्षातील सगळे दिवस मतदारसंघासाठी राखीव ठेवावे लागतात. स्वत:साठी नाही. मागील पाच वर्षात श्रीरंग बारणे यांनी ती कामगिरी केली असून त्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मावळचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी पुन्हा बारणे संसदेत गरजेचे आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील शास्तीकराचा प्रश्न राज्य सरकारने हाती घेतला आहे. लवकरच शास्तीकराचा प्रश्न सुटेल. शहरात मेट्रो, बीआरटी मार्ग महत्वाचे आहेत. मेट्रोचे काम महत्वाचे आहे. बैलगाडा शर्यतीचा प्रश्न महत्वाचा असून तो सोडविण्यासाठी आम्ही लढत आहोत. बैलगाडा शर्यतीचा  प्रश्न नक्कीच सोडविला जाईल, असे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईत नाईट लाईफ सुरु आहे. त्याची संपूर्ण महाराष्ट्रात आवश्यकता आहे. नाईट लाईफमुळे रोजगारात दुपट्टीने वाढ होईल. त्याचबरोबर महापालिकांच्या उत्पन्नात वाढ होईल.

लोणावळ्यासह पर्यटनस्थळी नाईट लाईफ सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. ठाकरे म्हणाले, जे आपण शिक्षण घेत आहोत. त्याचा रोजगार मिळविण्यासाठी उपयोग होईल का याचा विचार करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान वाढले असून आपण आजही 50 वर्षांपूर्वीचे शिक्षण घेत आहोत. त्यामुळे शिक्षणपद्धतीवर मोठा विचार करण्याची आवश्यकता आहे. शिवसेना-भाजपची युती देशहित आणि हिंदुत्वामुळे झाली आहे. एकीकडे देशहित, देशाची सुरक्षा पाहणारी महायुती तर दुसरीकडे देशद्रोहाचे कलम काढून टाकू असे म्हणणा-यांचे महागठबंधन आहे.

महागठबंधनच्या नेत्यांकडून देश तोडण्याची भाषा केली जाते. त्यांना दोन पंतप्रधान हवे आहेत. त्यामुळे कोणाला निवडून द्यायचे याचा सर्वांनी विचार करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्यावर हल्ला केल्यास त्यांना तशाच पद्धतीने उत्तर दिले आहे. त्यामुळे मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय नसून आंतरराष्ट्रीय निवडणूक आहे. सर्व जगाचे लोकसभेच्या निवडणुकीकडे लक्ष आहे, असेही ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी जिंकली तरुणांची मने…

आदित्य ठाकरे यांनी तरुणांच्या सर्व प्रश्नांना तरुणांमध्ये जाऊन अगदी मोकळेपणाने उत्तरे दिली. आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-यांची टोपीवर स्वाक्षरी घेतली. त्यांचे कौतुक केले. तसेच संवाद संपल्यानंतर आदित्य यांनी सर्वांसोबत ‘सेल्फी’ घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like