Pimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 29 ऑक्टोबर रोजी निवडणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी 29 ऑक्टोबर 2021 रोजी निवडणूक होणार आहे. पालिकेतील मधुकर पवळे सभागृहात सकाळी अकरा वाजता निवडणुकीला सुरुवात होणार असून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

दरम्यान, आठही प्रभागात भाजपचे वर्चस्व असल्याने आठही अध्यक्ष भाजपचे होणार हे निश्चित आहे. प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 25 ऑक्टोबर रोजी क्षेत्रीय अधिका-याकडे अर्ज करावे लागणार आहेत.

महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. प्रभाग अध्यक्षांचा कार्यकाळ एक वर्षांचा असतो. एप्रिल महिन्यात नवीन प्रभाग अध्यक्षांची निवडणूक होते. परंतु, कोरोनामुळे प्रभाग अध्यक्षाच्या नवीन नेमणूका करू नयेत असा आदेश राज्य सरकारने दिला होता. त्यामुळे विद्यमान प्रभाग अध्यक्षांना मुदतवाढ मिळाली होती.

सात महिने त्यांना मुदतवाढ मिळाली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. निर्बंध शिथील झाले आहेत. आता  29 ऑक्टोबर रोजी प्रभाग अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.  सकाळी अकरा वाजता निवडणुकीला सुरुवात होणार आहे. एका प्रभागाची झाल्यानंतर दुस-या प्रभागाची निवडणूक होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यासाठीची आचारसंहिता डिसेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी 2022 च्या पहिला आठवड्यात लागेल.

त्यामुळे नवीन प्रभाग अध्यक्षांना केवळ दीड ते दोन महिन्याचा कालावधी मिळणार आहे. मागील पावणेपाच वर्षात कोणतेही पद मिळाले नसलेल्या भाजप नगरसेवकांनी किमान शेवटच्या दोन महिन्यासाठी प्रभाग अध्यक्ष हे पद मिळावे यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आठही प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व आहे. अध्यक्ष भाजपचे होणार हे निश्चित आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.