Pune : पुण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला सोडणार नाही ; शहर काँग्रेसचा ठराव 

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नाही असा ठराव शहर काँग्रेसच्या बैठकीत शनिवारी करण्यात आला. पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम एकदिलाने करण्याच्या निर्धार देखील या बैठकीत इच्छुकांनी घेतल्या.
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मालिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुढील आठवड्यात प्रत्येक मतदारसंघाचा मुंबईत आढावा घेणार आहेत. त्याबाबत तयारीची शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुकांची बैठक झाली. पुण्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तर काय चित्र राहील आणि स्वतंत्र निवडणुका लढविल्यास काय होईल याबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर इच्छुकांच्या नांवाचीही यावेळी चर्चा झाली. त्यात माजी आमदार मोहन जोशी, माजी शहाराध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, तसेच पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी इच्छुक असल्याचे सांगितले. बैठकीला उपस्थित नसलेले आमदार अनंत गाडगीळ हे ही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या सर्व इच्छुकांनीं ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचे एकजुटीने काम करू व काँग्रेसची ही जागा पुन्हा जिंकून आणू असा निर्धार यावेळी केला.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने या मतदारसंघावर दावा ठोकत असल्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या अकरा जागा आहेत. त्यामधील आठ जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत, तर फक्त तीन जागा काँग्रेसकडे आहेत. त्यात आता पुण्याची जागा राष्ट्रवाडीकडे गेल्यास काँग्रेसचे अस्तित्वच संपुष्टात येईल, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीला सोडायची नाही असा ठराव याबैठकीत एकमताने करण्यात आला. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडेही हीच भूमिका ठामपणे मांडायची असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
दरम्यान विधानसभा निवडणूकीसाठी आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडे असलेल्या मतदार संघातील इच्छुकांच्या नांवावरही यावेळी चर्चा झाली. त्यात कसबा विधानसभा मतदारसंघातून अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे, सदानंद शेट्टी यांनी तर शिवाजींनगर मतदारसंघातून दीप्ती चवधरी, दत्ता बहिरट, मनीष आनंद व दत्तात्रय गायकवाड यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. पुणे केंटोमेन्ट मतदारसंघातून शहराअध्यक्ष रमेश बागवे, हडपसरमधून रशिद शेख आणि पर्वती मतदारसंघातून आबा बागुल व अभय छाजेड यांनीही आपण इच्छुक असल्याचे या बैठकीत सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.