Pimpri : महापौर, उपमहापौरांची 21 नोव्हेंबरला निवडणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले असून नवीन महापौर, उपमहापौरांची निवडणूक 21 नोव्हेंबरला होणार आहे. येत्या (शनिवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल 14 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरांना मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य शासनाने 22 ऑगस्ट रोजी अध्यादेश काढून महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. महापौर राहुल जाधव यांची 21 नोव्हेंबर रोजी मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे 21 नोव्हेंबर रोजीच नवीन महापौर, उपमहापौरांची निवड केली जाणार आहे.

याबाबत बोलताना नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ”नवीन महापौर, उपमहापौरांची निवड करण्यासाठी विशेष सभा बोलविण्यात येईल. या सभेसाठी पीठासीन अधिका-याच्या नेमणुकीकरिता उद्या (गुरुवारी) विभागीय आयुक्तांना पत्र देण्यात येणार आहे.  त्यानुसार शनिवारी (दि.16) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 21 नोव्हेंबर रोजी विशेष सभेत महापौर, उपमहापौरांची निवड केली जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.