Pimpri news: महापालिका विषय समिती सभापतीपदासाठी 23 ऑक्टोबरला निवडणूक

सोमवारी दाखल करायचेत अर्ज

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा,  क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समिती या पाच विषय समितींच्या सभापतीपदाची निवडणूक 23 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. सभापतीपदासाठी येत्या सोमवारी (दि.19)  दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. 

महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. ऋषीकेष यशोद कामकाज पाहणार आहेत.

कोरोनामुळे विषय समितीच्या निवडणुका राज्य सरकारने लांबणीवर टाकल्या होत्या. पालिकेतील समित्यांची मुदत संपल्याने बरखास्त झाल्या होत्या. अनलॉकमध्ये राज्य सरकारने ऑनलाईन सभेद्वारे निवडणुका घेण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. नव्याने विषय समित्यांचे गठन केले जाणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक आणि  शिक्षण समितीत 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या  महासभेत सदस्यांची निवड करण्यात आली.

महापालिकेतील तौलनिक पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्यांची प्रत्येक विषय समितीत निवड करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपचे बलाबल असल्याने सर्वंच समित्यांमध्ये भाजपचेच सभापती होणार हे निश्चित आहे. त्यामुळे सभापतीपदी वर्णी लागावी, यासाठी नगरसेवकांनी नेत्यांकडे फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.