Moshi News : शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग

आठ जणांची अग्निशमन दलाकडून सुटका

एमपीसी न्यूज – मोशी प्राधिकरण येथील एका इमारतीमध्ये इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग लागली. दरम्यान इमारतीमध्ये प्रचंड धूर झाला. या धुरामध्ये गुदमरलेल्या आठ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. ही घटना आज (शुक्रवारी, दि. 29) पहाटे सव्वाचार वाजता घडली.

अमोल प्रभाकर करके (वय 40), अमिता अमोल करके (वय 36), खंडप्पा सुभाष गोवे (वय 44), कीर्ती खंडाप्पा गोवे (वय 36), बोंगरंगे श्रीकृष्ण (वय 33), ज्योती गव्हाणे (वय 36), आकांशा करके (वय 8), अनुज करके (वय 6, सर्व रा. कृष्ण कुंज, मोतीलाल तालेरा इंग्लिश मीडियम स्कूल जवळ, मोशी प्राधिकरण) अशी अग्निशामक दलाने सुटका केलेल्या नागरिकांची नावे आहेत.

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजताच्या सुमारास पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाला मोशी प्राधिकरण येथे एका इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती नागेश गव्हाणे यांनी दिली. त्यानुसार पिंपरी चिंचवड अग्निशमन मुख्यालय आणि भोसरी उपकेंद्रातून आगीचे बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले.

मोशी प्राधिकरण येथे मोतीलाल तालेरा इंग्लिश मीडियम स्कूल जवळ असलेल्या कृष्णकुंज या इमारतीच्या जिन्याजवळ असलेल्या मीटर बॉक्स, इन्वर्टर आणि बोरवेल पॅनलला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. आग किरकोळ होती, मात्र वायरचा धूर संपूर्ण इमारतीमध्ये पसरला होता. त्यात आठ जण अडकून बसले. गुदमरलेल्या आठ जणांना खाली देखील येता येईना.

अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम धूर बाहेर जाण्यास मार्ग मोकळा केला आणि श्वसन यंत्राच्या साहाय्याने इमारतीमध्ये अडकलेल्या आठ जणांना सुखरूप बाहेर काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.