Pimpri News : ‘वायसीएम’ रूग्णालयातील वारंवार होणारी औषधांची टंचाई दूर करा

बी.आर.आंबेडकर ग्रुपची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (‘वायसीएम’) रूग्णालयात सध्या  औषधांची टंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत शहरामध्ये पावसाळी वातावरणामुळे ‘व्हायरल’ आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वायसीएम रूग्णालयाच्या ओपीडीमध्ये मोठी गर्दी होत आहे.

मात्र अनेक औषधांचा तुटवडा असल्याने नागरिकांना खासगी मेडीकलमधून औषधे आणण्यास सांगितले जात असल्याने गरिब रूग्णांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वारंवार होणारी औषधांची टंचाई दूर करावी अशी मागणी बी.आर. आंबेडकर ग्रुपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

ग्रूपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘वायसीएम’ रूग्णालय हे शहरातील सर्वात मोठे रूग्णालय आहे. याठिकाणी जिल्ह्यासह राज्यामधून रूग्ण उपचारासाठी येत असतात. तसेच शहरातील अनेक गोरगरिबांसाठी हे रूग्णालय वरदान आहे, मात्र महापालिकेच्या नाकर्त्या धोरणांचा फटका शहरातील नागरिकांना बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून ‘वायसीएम’ रूग्णालयातील अनेक औषधांचा साठा संपला आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे रूग्णालयात उपलब्ध नाहीत तसेच अनेक आजारांवर रूग्णांना देण्यात येणारी इंजेक्शनही संपली आहेत.

उपचारासाठी आलेल्या रूग्णांना इंजेक्शन व औषधे बाहेरील मेडीकलमधून घेण्यास सांगितले जात आहे. ‘वायसीएम’ रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांपैकी बहुसंख्य रूग्ण हे अत्यंत गरिब असल्याने त्यांना ही औषधे खरेदी करणे परवडत नसल्याने अनेकांना औषधाविनाच परतावे लागत आहे, त्यामुळे या रूग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सद्यस्थितीत रूग्णालयामध्ये आसलेल्या औषध तुटवड्यावर प्रशासन गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे तुटवड्याबाबत उत्तरेही हास्यस्पद दिली जात आहेत. कोरोनाच्या काळामध्ये भाववाढ झाल्याने काही औषधांची खरेदी करता आली नाही.

कोरोना काळामध्ये अनेक कंपन्यांनी 50 टक्के क्षमतेवर काम सुरू ठेवले आहे. यामुळे औषधांचे उत्पादन पूर्ण क्षमतेने झाले नाही. तर काही जणांना वाहतुकीची अडचण असल्याने औषधांचा पुरवठा वेळेत होत नसलयाचा दावा प्रशासनाने केला आहे, मात्र औषधांच्या खरेदीवर महापालिका कोट्यावधी रूपयांचा खर्च करत आहे. नागरिकांना आरोग्याच्या सोयी-सुविधा उत्तम व वेळेत मिळाव्यात यासाठी हा खर्च केला जातो परंतु दुसरीकडे औषधांची उपलब्धतता वेळेत होत नसल्याचे वास्तव आहे. या तुटवड्यास पालिका प्रशासन जबाबदार आहे की औषध कंपन्या हा प्रश्न उपस्थित झाला आहे, तरी आपणास या निवेदनाद्वारे विनंती आहे की लवकरात लवकर ‘वायसीएम’ रूग्णालयातील औषधांची टंचाई दुर करावे अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.