Chakan : महाराष्ट्र अंनिसकडून जट निर्मूलन

(अविनाश दुधवडे) 
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी ७४ व्या महिलेचे जट निर्मुलन रविवारी (दि.१६) चाकण (ता. खेड) येथे केले. चाकणमधील एका महिलेला अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढत दहा वर्षांच्या जटांच्या ओझ्यातून मुक्ती दिली आहे. 

मागील दहा वर्षापासून तीन किलो जटेचे ओझे तसेच अंधश्रद्धेच्या भीतीने शारीरिक मानसिक त्रास सहन करणारी संबंधित महिला गेली दहा वर्षे या जटेमुळे त्रस्त होती. मात्र, संबंधित महिलेच्या पतीने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या नंदिती जाधव यांना फोन करून माझ्या पत्नीच्या डोक्यात गेली दहा वर्षापासून जट असल्याचे सांगितले पण ती कापल्याने काही संकट येईल अशी भीती पत्नीच्या मनात असल्याचे सांगितले.  त्यानंतर रविवारी अंनिसच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांच्यासह राज्याचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा सचिव मनोहर (बापू) शेवकरी, नारायण करपे, विशाल बारवकर यांनी संबंधित कुटुंबाचे प्रबोधन केले व संबंधित महिलेला जटांच्या ओझ्यातून मुक्ती दिली.

नंदिती जाधव यांनी सांगितले की, जटांचा संबंध देवीदेवतांशी जोडला जातो. त्या सोडविल्यावर देवीचा कोप होईल. जटा सोडविणाऱ्यांचे हात झडतील, डोळे जातील, अशा अंधश्रद्धा आजही आहेत. त्यामुळे जटा सोडवून घेण्यासाठी या स्त्रिया तयार होत नाहीत. त्यांना त्यांच्या नातेवाइकांना जटा होण्यामागची कारणे आणि जटा सोडविणे का आवश्‍यक आहे, हे पटवून देणे महत्त्वाचे आहे. एकदा का ती स्त्री जटा सोडवून घ्यायला स्वखुशीने तयार झाली, की अर्धी लढाई जिंकल्यासारखी आम्हाला वाटते. आत्तापर्यंत ७४ महिलांचे जट निर्मुलन केल्याचेही त्यांनी सांगितले.

‘जटामुक्त समाजाचा’ वसा ; नंदिती जाधव

केसात जटा झालेल्या स्त्रियांच्या मनातील भीती दूर करायची, त्यांना जटा सोडवून घेण्यासाठी तयार करायचे, केसातल्या जटा सोडवायच्या, त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यायचे आणि वेळोवेळी समुपदेशन करायचे, असे प्रयत्न अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ‘जटामुक्त समाजाचा’  वसा घेतला आहे. अंनिसच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य गावोगावी जाऊन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही नंदिती जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.