Wakad News: फ्लॅट घेण्यासाठी दिलेल्या सहा लाख रुपयांचा अपहार; सुनेसह चौघांवर गुन्हा दाखल

ही सर्व रक्कम घेऊन सून तिच्या माहेरी मध्यप्रदेश येथे निघून गेली. शारदा यांचा मुलगा वरुण यांनी पत्नी हिनाकडे रक्कम मागितली असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला.

एमपीसी न्यूज – फ्लॅट घेण्यासाठी सासूने सुनेकडे सहा लाख रुपये दिले. ती रक्कम फ्लॅट घेण्यासाठी गुंतवून पुन्हा फ्लॅट घेण्याचे रद्द करून बांधकाम व्यावसायिकाकडून सर्व पैसे घेऊन अपहार केला. पैसे घेऊन सून माहेरी निघून गेली. पतीने पैसे मागण्याचा प्रयत्न केला असता आरोपी पत्नी, तिचे वडील, आई आणि भावाने त्यांना जिवे मारण्याची धमकी देत पैसे देण्यास नकार दिला. याबाबत सासूने सुन, सुनेचे आई, वडील आणि भाऊ या चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार 13 जानेवारी 2020 पासून 28 जुलै 2020 या कालावधीत पुनावळे, वाकड येथे घडला.

सून हिना अशोक रोरा, सुनेची आई मेनका अशोक रोरा, सुनेचे वडील अशोक रोरा, सुनेचा भाऊ आशिष अशोक रोरा (सर्व रा. ग्रेड लष्कर ग्वालियर, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सासू शारदा अशोक नागवणी (वय 62, रा. पुनावळे, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा यांचा मुलगा आणि आरोपी हिना यांचा जुलै 2019 मध्ये विवाह झाला. त्यानंतर सर्व कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. लग्नानंतर सून हिना हिने नवीन फ्लॅट घेण्याचा आग्रह केला. त्यानुसार, हिंजवडी फेज तीनमध्ये मुलगा वरुण, सून हीना आणि सासू शारदा या तिघांच्या नावावर 43 लाख रुपये किमतीचा 2 बीएचके फ्लॅट घेण्याचे निश्चित केले.

दरम्यान, मुलगा वरुण कामानिमित्त चेन्नईला गेला. शारदा यांना लिहिता-वाचता येत नसल्याने फ्लॅटचे बुकिंग करण्यासाठी वेळोवेळी सून हिनाकडे सहा लाख रुपये दिले. सर्व रक्कम बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आली. दरम्यान, फिर्यादी शारदा यांच्या कौटुंबिक कारणांमुळे फ्लॅट घेण्याचे रद्द झाले.

फ्लॅट घ्यायचे रद्द झाल्याने बुकिंगसाठी दिलेली रक्कम बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली असता व्यावसायिकाने सून हिना हिच्या बँक खात्यावर पाठवून दिली. ही सर्व रक्कम घेऊन सून तिच्या माहेरी मध्यप्रदेश येथे निघून गेली. शारदा यांचा मुलगा वरुण यांनी पत्नी हिनाकडे रक्कम मागितली असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला.

तसेच ‘आम्ही तुला पैसे देणार नाही. तुला काय करायचे ते कर. तू पैसे घेण्यासाठी ग्वाल्हेरला आल्यावर तुला ठार मारून टाकीन’ अशी आरोपींनी वरूण यांना धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.