Pune : अग्निशमन आणि आरोग्य विभागात होणार तातडीची पद भरती

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या आरोग्य आणि अग्निशामन दलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या तातडीच्या पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने या भरतीसाठी सकारात्मक अभिप्राय दिला असून हा प्रस्ताव अर्थ विभागाच्या मान्यतेसाठी गेला असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.  सुमारे 100 हून अधिक पदांची ही भरती असणार आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागात तज्ञ डॉक्टरांची अनेक पदे रिकामी आहेत. त्यामुळे महापालिकेकडून शहरात लाखो रुपये खर्चून मोठी हॉस्पिटल उभारण्यात आली असतानाही केवळ कर्मचारी नसल्याने या रुग्णालयांचे खासगीकरण करण्याची वेळ आली आहे. तशीच स्थिती पालिकेच्या अग्निशमन दलाची आहे. या विभागासाठी सुमारे 900 पदे मंजूर असून प्रत्यक्षात केवळ 450 कर्मचारी कार्यरत आहेत. तर पालिकेने शहरात नवीन चार अग्निशमन केंद्र उभारली असून केवळ कर्मचारी नसल्याने ही केंद्र बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर आली आहे. ही बाब लक्षात घेऊन या दोन्ही विभागांच्या सुमारे 120 कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्याच्या नगरविकास विभागास पाठवला होता. मात्र, शासनाकडून त्याबाबत काहीच हालचाली नव्हत्या. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाकडे प्रलंबित विषयाबाबत झालेल्या बैठकीमध्ये ही पदभरती गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर नगर विकास विभागाने या पदभरतीला मंजुरी दिली असून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी अर्थ विभागाकडे गेला असल्याची माहिती सौरभ राव यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.