Pune : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व सुरक्षित करण्यावर भर देणार – एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज – राज्यातील मोठ्या शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व सुरक्षित करण्यावर राज्य शासन भर देणार असून पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यात मेट्रो महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट या पाच किलोमीटर भूयारी मार्गासाठी चार टीबीएम मशीन वापरण्यात येणार आहेत. महामेट्रोच्या वतीने आयोजित पुणे मेट्रोच्या भूयारी कामासाठीच्या ‘मुळा’ दुसऱ्या टीबीएम मशिनचे अनावरण व कामाचा शुभारंभ आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार अनिल भोसले, महामेट्रोचे संचालक सुब्रमणियम रामनाथ, अतुल गाडगीळ, विनोदकुमार अग्रवाल, वरिष्ठ अधिकारी आदि उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, पुण्यातील मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. हे काम कठीण आणि आव्हानात्मक असले तरी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्यामुळे अडचण येणार नाही. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर वेळेची व इंधनाची बचत होण्याबरोबरच वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. महामेट्रो ने मेट्रोचे काम गतीने आणि दर्जेदार पद्धतीने करावे. हे काम निर्देशित वेळेत पूर्ण करुन महामेट्रोने नागरिकांना त्याचा आनंद द्यावा, असे सांगून शिंदे म्हणाले, दळणवळण व्यवस्था चांगली असेल तर राज्याचा विकास गतीने होतो. यासाठी येत्या काळात राज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.

मेट्रोच्या भूयारी मार्गासाठी वापरण्यात येणाऱ्या टीबीएम मशिन विषयी…

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा टप्पा भूयारी मार्गाचा आहे. या पाच किलोमीटर भूयारी मार्गासाठी चार टीबीएम मशिन वापरण्यात येणार आहेत. यापैकी ‘मुळा’ या पहिल्या टीबीएम मशिनने 31 नोव्हेंबर 2019 रोजी कृषी महाविद्यालय पटांगण येथून बोगद्याचे काम सुरु केले आहे. महामेट्रोकडे ‘मुळा’ हे दुसरे टीबीएम मशिन दाखल झाले असून या कामाचे उद्घाटन आज नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

पुणे शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोगद्याचे काम सुरू होत असून एकूण चार टीबीएमद्वारे साधारणपणे दहा किलोमीटर लांबीचा बोगदा बनवण्यात येत आहे. पुणे मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महामेट्रोने जागतिक दर्जाच्या अद्ययावत टीबीएम मशिनचे पाचारण केले आहे. हे टीबीएम मशिन जपान इन्फ्रास्ट्रक्चर (जेआयएस) आणि ऑस्ट्रेलियन स्टँडर्ड (एएस) या जागतिक मानांकनानुसार आधारित असून त्याचा व्यास 6.६५ मीटर आणि लांबी १२० मीटर आहे. हे अवजड मशिन २१० के डब्ल्यूच्या सहा विजेवर चालणाऱ्या मोटारींद्वारे चालवले जाते.

टनेल बोरिंग मशिन जसजसे पुढे सरकते तसतसे या मशिनच्या मागील यंत्रणा सिमेंट काँक्रिटच्या बनविलेल्या रिंगची स्थापना करत जाते. तसेच रिंग आणि भूयार यामध्ये सिमेंट काँक्रिटचा भरणा करण्यात येतो. अशा प्रकारे भूयारात काँक्रिटच्या प्री कास्ट रिंगचे आच्छादन बिछवण्यात येते. या अत्याधुनिक टीबीएम मशिनद्वारे जमिनीखाली सिमेंट काँक्रिटची एक प्रकारे नळी तयार होते व या नळीमध्ये रेल्वे रुळ टाकून त्यावर मेट्रो धावते. मेट्रोचे जाणारे व येणारे असे दोन स्वतंत्र भूयारी मार्ग बनवण्यात येणार आहेत.

पुणे मेट्रोने निवडलेले टीबीएम हे संगणकाद्वारे नियंत्रित अत्याधुनिक टीबीएम मशिन आहे. यामध्ये सुरक्षासंबंधी जागतिक दर्जाची प्रणाली वापरण्यात आली आहे. टनेलमध्ये हवेचा दाब व ऑक्सिजन, कार्बनडायऑक्सााईड आणि इतर वायू यांचे सेन्सर लावण्यात आले आहेत व टनेल व्हेंटिलेशन प्रणालीद्वारे यावर नियंत्रण ठेवण्यात येते. हे मशीन 24 तासात 8 ते 10 मीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण करु शकते.

भूयारी मार्गाचे काम सुरु होण्यापूर्वी भूपृष्ठावरील घरे आणि बिल्डिंगच्या कंडिशनचा सर्वे पूर्ण करण्यात येतो. या सर्वेमध्ये भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंना ५० मीटर भूभागावरील प्रत्येक घराच्या प्रत्येक भिंतींचा फोटो व व्हिडिओ काढून ते घर मालकांना देण्यात येतात, जेणेकरून या मशिनमुळे घराला इजा पोहोचली का, याची शहानिशा करण्यात येते. पुणे मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येणारे टीबीएम मशिन अत्याधुनिक असल्यामुळे भूपृष्ठावरील घरांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.