Pune : सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळावे यासाठी कर्मचाऱ्यांना मिळणार ओळखपत्र

एमपीसी न्यूज – सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रमाणेच महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभासाठी संबंधित कार्यालयात जा-ये करण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर एक वर्षाच्या कालावधीसाठी ओळखपत्र देण्याचा विषय महापालिका स्थायी समितीत बुधवारी मंजूर करण्यात आला. 28 जुलै 2000 च्या परिपत्रकान्वये हा निर्णय घेण्यात आला आहे.

सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतनाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी, शासकीय रुग्णालयातील औषधोपचार, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बॅंक, एसटी याठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच सरकारी अधिकारी कर्मचारी म्हणून समाजात वागणूक मिळण्याच्या दृष्टीने हे परिपत्रक काढण्यात आले होते. त्याच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र हे ओळखपत्र देताना काही अटी आणि बंधने घालण्यात आली आहेत. त्यामध्ये सेवानिवृत्तीनंतर दिल्या जाणाऱ्या ओळखपत्रावर पदनामाआधी “सेवानिवृत्त’ असे नमूद करणे अनिवार्य आहे. तसेच सदर कर्मचारी अथवा अधिकाऱ्याने सेवेत असतानाचे ओळखपत्र सरकारकडे जमा केले आहे का याची खातरजमा करावी याचा समावेश करण्यात आला आहे. या अटी आणि बंधनाच्या अधीन राहून हा विषय स्थायी समितीने मंजूर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.