Pimpri News: महापालिकेच्या व्यापारी संकुलातील रिकामी दुकाने ‘प्रथम मागणी’ करणाऱ्यास प्राधान्य!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध व्यापारी संकुलांतील रिकाम्या दुकानांच्या वितरणासाठी निविदा पद्धतीचा वापर करण्यात येतो. तथापि, व्यापार संकुलातील अनेक दुकाने रिकामी राहत असल्यामुळे महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी स्थायी समितीने केलेल्या ठरावानुसार प्रथम मागणी येईल, त्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर रिक्त दुकान महापालिकेद्वारे वितरित करण्यात येणार आहेत.

रिक्त दुकानांकरिता इच्छुक व्यक्तींनी 15 दिवसांच्या आत बंद पाकिटातून महापालिका दरापेक्षा सर्वोच्च दर लेखी स्वरूपात अर्जात नमूद करून अर्ज सादर करावा. 15 दिवसांनंतर एकाच दुकानासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारास लेखी पत्राद्वारे कळविल्यानंतर 30 दिवसांच्या आत डीडीद्वारे रक्कम भरणे बंधनकारक राहील.

एकाच दुकानासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींचे समान दर प्राप्त झाल्यास बंद पाकिटातून 7 दिवसांत पुन्हा दर मागवून सर्वोच्च दराने अर्जदारास दुकान वितरित करण्यात येणार आहे. मासिक भाडेदराने येणारे दुकान किमान सहा महिने आगाऊ भाडे भरून वितरित करण्यात येईल. एकाच दुकानाकरिता दीर्घ मुदतीचे आणि मासिक भाड्याने मिळण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास प्रथम दीर्घ मुदतीच्या अर्जदाराचा विचार करण्यात येईल.

दुकानांचे मागासवर्गीय, महिला बचत गट शेतकरी, उत्पादित गट, दिव्यांग या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या दुकानांसाठी अर्ज प्राप्त झाले नाही, तर दुकाने खुले करून पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे. दुकान मंजूर झाले तथापि रक्कम भरली नाही, अशी व्यक्ती, संस्था यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत. रिक्त दुकानांसाठी इच्छुक व्यक्तींनी, संस्थांनी 5 ते 21 जानेवारीपर्यंत सहायक आयुक्त भूमी आणि जिंदगी विभाग यांच्या नावाने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.