Dighi News : दत्तगड पायथ्याशी असलेल्या पाण्याच्या टाकीचे व्यवस्थापन सक्षम करा – विकास डोळस

एमपीसी न्यूज – दिघीतील दत्तगड पायथ्याशी असलेल्या पाण्याच्या टाकीचे व्यवस्थापन सक्षम करा. शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत आहे, अशा परिस्थितीत टाकी ओव्हर फ्लो झाल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. त्यामुळे प्रशासनाने योग्य नियोजन करून टाकीचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी भाजप नगरसेवक विकास डोळस यांनी केली आहे.

याबाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नगरसेवक डोळस यांनी म्हटले आहे की, दिघीसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याच्या तुटवड्यामुळे एकीकडे पालिका प्रशासन नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. असे असताना दिघी भागाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्याने लाखो लीटर पाणी वाया गेल्याचा गंभीर प्रकार  घडला आहे. वारंवार असे प्रकार घडत आहेत, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दिघीतील दत्तगड पायथ्याशी असलेली पाणीटाकी वारंवार ओव्हर फ्लो होवून पाणी वाया जात आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. महापालिका अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.

त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाने दत्तगड पायथ्याशी असलेल्या पाणी टाकीचे व्यवस्थापन पाहणारे अधिकारी-कर्मचारी यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस द्यावी. तसेच, भविष्यात टाकी ओव्हर फ्लो होवून पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी आमची मागणी आहे.

प्रशासनाने चालढकल केल्यास आणि पुन्हा पाणी वाया गेल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेवून महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशाराही नगरसेवक डोळस यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.