Pune : आंबील ओढ्याला पूर येण्यास अतिक्रमणे कारणीभूत ; महापालिका प्रशासनाचा अहवाल

एमपीसी न्यूज – आंबील ओढ्याला दिनांक 25 सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामध्ये 20 पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला होता. अनेक नागरिकांचे संसार वाहून गेले होते. या पुराला ओढ्यालागत झालेली मोठमोठी अतिक्रमणे कारणीभूत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे. अनेक धनदांडग्यांनीही अतिक्रमणे केली आहेत. त्या संबंधिचा अहवाल येत्या दिनांक 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच या अतिक्रमणावर कारवाई होणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

या पुरात टांगेवला कॉलनीतील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळी सांत्वनासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकांनी हुसकावून लावले होते. सत्ताधाऱ्यांचा निषेधही यावेळी करण्यात आला होता. महापालिका प्रशासनाने एका संस्थेमार्फत या संबंधीचा अहवाल तयार केला आहे. नाल्याला मोठा पूर येण्यास ही अतिक्रमणे कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अतिक्रमणामुळे नाल्याची रुंदीही कमी झाली आहे.

या पुराच्या पाण्यामुळे महापालिकेच्या ड्रेनेज लाईन चोकप झाल्या होत्या. ते सर्व पाणी नंतर सोसायट्यांमध्ये घुसले. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. कात्रजपासून वैकुंठ स्मशानापर्यंत कोणकोणत्या भागांत अतिक्रमणे झाली आहेत. त्याचा अहवालात समावेश करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.