ENG Vs IRL: इंग्लंडची विजयी घोडदौड सुरूच, आयर्लंड विरुद्धची दुसरी वनडे ही जिंकली

ENG Vs IRL: England continue their winning streak, win second ODI against Ireland इंग्लंडच्या विजयासाठी यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोने 82 धावांची धडाकेबाज खेळी केली. याच खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

एमपीसी न्यूज – पहिली वन-डे जिंकल्यानंतर दुसरी वन-डे देखील जिंकून इंग्लंडने आयर्लंड विरुद्धची एकदिवसीय मालिका खिशात घातली आहे. आयर्लंडने विजयासाठी दिलेलं 213 धावांचं आव्हान इंग्लंडने पार करत विजयावर शिक्कामोर्तब केला आहे.

नाणेफेक जिंकत आयर्लंडचा कर्णधार अँडी बालब्रिनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आयर्लंडचा डाव 212 धावांत आटोपला. कँफरने या सामन्यात 68 धावांची उपयुक्त खेळी केली.

इंग्लंडकडून फिरकीपटू आदिल रशीदने 3 तर डेव्हिड विली-साकीब महमुद या जोडीने प्रत्येकी 2-2 आणि टोपले-विन्स जोडीने 1-1 बळी घेतला.

213 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात देखील खराब झाली. सलामीवीर जेसन रॉयचा यंगने 0 धावांवर त्रिफळा उडवला.

मात्र, दुसऱ्या बाजूने जॉनी बेअरस्टोने इतर फलंदाजांसोबत एक बाजू लावून धरत इंग्लंडला संकटात सापडू दिलं नाही. मधल्या फळीत सॅम बिलिंग्ज आणि अखेरच्या फळीत डेव्हिड विलीनेही फटकेबाजी करत बेअरस्टोला चांगली साथ दिली.

याच प्रयत्नांच्या जोरावर इंग्लंडने आयर्लंडचं 213 धावांचं आव्हान 33 व्या षटकात पूर्ण करत सामना आणि मालिकेत बाजी मारली. आयर्लंडकडून जोश लिटीलने 3, कर्टिस कँफरने 2 तर क्रेग यंगने 1 बळी घेतला.

इंग्लंडच्या विजयासाठी यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोने 82 धावांची धडाकेबाज खेळी केली. याच खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.