ENG Vs IRL : आयर्लंडची कडवी झुंज, अंतिम सामना 7 गडी आणि 1 चेंडू राखून जिंकला

सुपर लीगमध्ये 10 गुणांची कमाई : Ireland won the final by 7 wickets and 1 ball

एमपीसी न्यूज – पहिल्या दोनही सामन्यात सहज विजय मिळवणाऱ्या इंग्लंडला आयर्लंडने मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवून दिले नाही. कर्णधार इयॉन मॉर्गनच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने 32 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. पण पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बल्बर्नी या दोघांच्या शतकांच्या बळावर आयर्लंडने 49.5 षटकात हे लक्ष्य पूर्ण केले आणि सुपर लीगमध्ये 10 गुणांची कमाई केली आहे.

आयर्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली, पण नंतर इयॉन मॉर्गनने दमदार फलंदाजी केली. त्याने 84 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 106 धावा केल्या.

त्याला चॉम बँटन चांगली साथ देत अर्धशतक (58) झळकावले. तळाचे फलंदाज डेव्हिड विली (51) आणि टॉम करन (नाबाद 38) यांनीही चांगली खेळी केल्यामुळे इंग्लंडने 50 षटकात 328 धावांपर्यंत मजल मारली.

329 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा पहिला बळी लवकर बाद झाला. पण नंतर पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बल्बर्नी यांनी 214 धावांची भागीदारी केली. स्टर्लिंगने 128 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 142 धावा केल्या.

तर बल्बर्नीने 112 चेंडूत 12 चौकारांसह 113 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत केविन ओब्रायनच्या निर्णायक फटकेबाजीच्या (15 चेंडूत नाबाद 21) जोरावर आयर्लंडने 7 गडी आणि 1 चेंडू राखून सामना जिंकला.

पॉल स्टर्लिंगला सामनावीर तर डेव्हिड विलीला मालिकावीर घोषित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.