Stuart Broad: इंग्लंडच्या विजयात स्टुअर्ट ब्रॉडची अष्टपैलू कामगिरी; ठरला 500 बळी घेणारा गोलंदाज

England vs West Indies: Stuart Broad Becomes 7th Bowler To Take 500 Test Wickets कसोटी सामन्यात अर्धशतक आणि 10 बळी घेणारा ब्रॉड हा इंग्लंडचा 1980 नंतरचा पहिलाच जलदगती गोलंदाज ठरला आहे.

एमपीसी न्यूज – इंग्लंडने अखेरचा सामना जिंकून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका 2-1 ने जिंकली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने अष्टपैलू कामगिरी केली. एवढंच नव्हे तर त्याने आपला 500 बळींचा टप्पा देखील पूर्ण केला आहे.

स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्या डावात अखेरच्या फळीत 45 चेंडूत 62 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत 9 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ब्रॉडने अखेरच्या फळीत केलेल्या या अष्टपैलू खेळीमुळे इंग्लंडने पहिल्या डावात 369 धावांपर्यंत मजल मारली.

यानंतर ब्रॉडने पहिल्या डावात 6 बळी घेत विंडीजच्या डावाला खिंडार पाडलं. दुसऱ्या डावातही गोलंदाजीत आपली चमक दाखवत ब्रॉडने 4 बळी घेतले. कसोटी सामन्यात अर्धशतक आणि 10 बळी घेणारा ब्रॉड हा इंग्लंडचा 1980 नंतरचा पहिलाच जलदगती गोलंदाज ठरला आहे.

कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडने 500 बळींचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा तर इंग्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला. याआधी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने 500 बळींचा टप्पा पार केलेला आहे.

कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज :

1) मुथैया मुरलीधरन (श्रीलंका) : 800 बळी

2) शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) : 708 बळी

3) अनिल कुंबळे (भारत) : 619 बळी

4) जेम्स अँडरसन (इंग्लंड) : 589 बळी

5) ग्लेन मॅकग्राथ (ऑस्ट्रेलिया) : 563 बळी

6) कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) : 519 बळी

7) स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) : 500 बळी

स्टुअर्ट ब्रॉडने वेस्टइंडीजच्या ब्रेथवेटला पायचीत करुन कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे बळींचा टप्पा पार केला. कसोटीत सर्वाधिक बळी टिपण्यात श्रीलंकेचा मुथैया मुरलीधरन 800 बळीसह प्रथम क्रमांकावर आहे. तर, भारतीय अनिल कुंबळे 619 बळीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.