England Vs WI: दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 113 धावांनी विजय; मालिकेत 1-1 ने बरोबरीत

England Vs WI: England win second Test by 113 runs; The series in a 1-1 draw पहिल्या डावात चांगली कामगिरी करणारे क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस हे दुसऱ्या डावात स्वस्तात माघारी परतले.

एमपीसी न्यूज – पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर अखेर दुसरा कसोटी सामना जिंकण्यात इंग्लंडला यश आलं आहे. इंग्लंडने अखेरच्या दिवशी विजय खेचून आणत वेस्ट इंडिजवर 113 धावांनी मात केली. या विजयासह 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला बेन स्टोक्सने फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. स्टोक्सच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने आपला दुसरा डाव 129 धावांवर घोषित करुन विंडीजला 312 धावांचं आव्हान दिलं. मात्र विंडीजची दुसऱ्या डावातील सुरुवात अतिशय खराब झाली.

इंग्लंडच्या माऱ्यासमोर विंडीजचा डाव कोसळला. दुसऱ्या डावात ब्रुक्स, ब्लॅकवूड आणि कर्णधार जेसन होल्डर यांचा अपवाद वगळता एकही विंडीज फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही.

पहिल्या डावात चांगली कामगिरी करणारे क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस हे दुसऱ्या डावात स्वस्तात माघारी परतले. ब्रुक्सने 62 तर ब्लॅकवूडने 55 धावांची खेळी केली. कर्णधार जेसन होल्डरनेही 35 धावांची खेळी करत चांगली झुंज दिली.


312 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 198 धावांवर गुंडाळला. दुसर्या कसोटीत इंग्लंडने 113 धावांनी विजय मिळवत तीन कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-1 अशी बरोबरी केली आहे.

त्यामुळे तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. जर हा सामना वेस्ट इंडिजने जिंकला तर 32 वर्षांनंतर वेस्ट इंडिज संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.