Pune : महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडूनच सहकारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महानगरपालिकेतील मुख्य आरोग्य निरीक्षक असलेल्या वरिष्ठ अधिका-याने सहकारी महिलेकडे  शरीरसुखाची मागणी केली, असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अधिका-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब साबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या ढोले पाटील रोड येथील क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याकडे मुख्य आरोग्य निरीक्षकाने वेळोवेळी व प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केली. संबंधित महिलेने याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून मुख्य आरोग्य निरीक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालयात फिर्यादी महिला जून 2018 पासून कार्यरत आहेत. आरोपी साबळे याने जून 2018 ते 24 ऑक्टोबर 2018 या कालावधीत महिलेला फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून शरीरसुखाची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्याने 24 ऑक्टोबर रोजी या महिलेला कामानिमित्त कोरेगाव पार्क येथे बोलवून तिला शरीरसुखाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यावर तिचा हात पकडून तिला त्रास दिला. त्यानंतर महिलेने पतीसह पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.