Entertainment News : आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रितीने चित्रीकरण करा : मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोविड तपासणी करावी, लसीकरण होईल हे पाहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

चित्रपट निर्मात्यांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कोविडविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पडले जाईल अशी ग्वाही दिली.

हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या प्रमुख संस्था असलेल्या प्रोड्युसर गिल्डचे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा, सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव यांनीही बैठकीत सहभागी होऊन सूचना केल्या. बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे देखील सहभागी होते.

पथकाचे लसीकरण व कोरोना तपासणी आवश्यक

निर्बंध टाकून तुम्हाला अडविणे आम्हालाही आवडत नाही, पण महारष्ट्र आणि केरळसह देशातील इतर काही राज्यांमधून कोरोनाचा संसर्ग अजूनही आहे. संरक्षित अशा बायो बबलची व्यवस्था करूनही काही क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमादरम्यान संसर्ग झालेला दिसतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देखील आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नसून जगातील इतर देशांत परत तिसरी लाट उसळल्याचे दिसते, त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेत राहणे आवश्यक आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांनी कोविड संदर्भात आपल्या कलाकार व कर्मचाऱ्यांची विशिष्ट दिवसानंतर कोरोना चाचणी करीत राहणे, पथकातील कुणाला ताप जरी आला असेल किंवा काही लक्षणे दिसत असतील तर त्वरित दखल घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांचे दोन्ही डोसेससह लसीकरण असणे गरजेचे आहे. निर्बंध कायम न ठेवता कोरोना परिस्थितीची पाहणी करून टप्प्याटप्प्याने, सावधपणे, आणि सुरक्षितरित्या ते उठविण्याबाबत राज्य शासन पाउले टाकत आहे. पण यासाठी सर्वांचे मोठे सहकार्य लागणार आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.