Entertainment News : ‘हम गया नही… जिंदा है’ चित्रपट गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला

एमपीसी न्यूज – ‘हम गया नही…. जिंदा है स्वामी करतील अशक्य ते शक्य’ हा चित्रपट गुरुवारी (दि. 25) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या नावातील ‘स्वामी करतील अशक्य ते शक्य’ या उक्तीप्रमाणे चित्रपटगृहे बंद असल्याने हा चित्रपट सर्व स्वामी भक्तांच्या भेटीला युट्युब चॅनेलद्वारे येणार आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी ‘अक्कलकोट महाराज फिल्म्स’ या युट्युब चॅनेलवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

स्वामींच्या वेगवेगळ्या मठांमध्ये येणा-या स्वामीभक्तांना स्वामींची प्रचिती येते. आपल्या मनात नसेल तरीही स्वामी ते कार्य आपल्या हातून योजून घेतात, याचीच प्रचिती म्हणजे ‘हम गया नही…. जिंदा है स्वामी करतील अशक्य ते शक्य’ हा चित्रपट.

दिग्दर्शक प्रा. अभिषेक निकम आणि त्यांचे बंधू स्वामींच्या मठांमध्ये प्रसाद रुपात चरित्राचे वाटप करत असताना अचानक एका स्वामी भक्ताने त्यांना चित्रपट लिहिण्याबाबत सांगितले.

आपल्या ओळखीचाही नसलेल्या स्वामी भक्ताकडे सुरुवातीला निकम यांनी दुर्लक्ष केले. मात्र, प्रा. निकम यांनी स्वतःला याची अनुभूती आल्यानंतर त्यांनी चित्रपट लिखाणाच्या कामाला सुरुवात केली. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटात अनेक घटनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

चित्रपटात उषा नाडकर्णी, ऋषीकेश प्रधान, योगेश सोमण, शुभांगी लाटकर, धनश्री भालेकर, धनश्री प्रधान, विघ्नेश कुलकर्णी, जनार्दन कदम अशा एकापेक्षा अधिक सरस कलाकारांनी अभिनय केला आहे. सुमारे 70 कलाकारांचे चित्रपटात संवाद आहेत.

लॉकडाऊनच्या काळातही हा चित्रपट तयार झाला. यासाठी आर्थिक निधी जगभरातील अनेक स्वामीभक्तांनी सढळ हाताने दिला असल्याचे दिग्दर्शक आणि निर्माते प्रा. अभिषेक निकम सांगतात.

देवाला कसं समजायचं, जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची, याचा पाठ प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळेल. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलेले ‘ह्या मतलबी दुनियेत राहण्यासाठी दोनच जागा चांगल्या आहेत. एक स्वामींच्या चरणात आणि दुसरी श्री स्वामींच्या नामस्मरणात.’ हे वाक्य चित्रपटाच्या विषयाची खोली दर्शवून जाते.

दिग्दर्शक आणि निर्माते प्रा. अभिषेक निकम चित्रपटाबद्दल सांगताना म्हणतात, “तुम्हाला हवी तशी एखादी गोष्ट झाली नाही तर काळजी करू नका. स्वामींची योजना कदाचित वेगळी असेल. ‘हम गया नही…. जिंदा है स्वामी करतील अशक्य ते शक्य’ या चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत याचे अनेकदा दाखले मिळाले आहेत.”

तर स्वामींच्या अनेक लीलांवर, सत्यघटनांवर आधारित असलेला ‘हम गया नही…. जिंदा है स्वामी करतील अशक्य ते शक्य’ हा चित्रपट पाहायलाच हवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.