Pune News : उद्योजक गौतम पाषाणकर पुन्हा अडचणीत

दोन कोटी 40 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळख असलेले गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर फसवणूक आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल दोन कोटी 40 लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. 

गौतम पाषाणकर, रिनल पाषाणकर आणि दीप विजय पुरोहित यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रॉक्सीमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातील सी बिल्डिंग मधील फ्लॅट 101 आणि 102 ची किंमत 2 कोटी 87 लाख रुपये ठरवली. हे दोन फ्लॅट त्यांनी फिर्यादीला विकले. त्याचा करारनामा ही केला. फिर्यादीकडून या बदल्यात दोन कोटी 40 लाख रुपये घेतले. परंतु ताबा व नोंदणीकृत दस्त न करता सदर सदनिकेचे खरेदीखत परस्पर दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर करून फसवणूक केली आहे.

याविषयी फिर्यादी यांनी आरोपींना विचारणा केली असता त्यांनी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या ऑफिसमध्ये त्यांना बोलावले आणि नोकरांकरवी बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान तक्रार आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी भा.द.वि. 409 420 326 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.