Pimpri News : निर्बंधांमुळे उद्योजकांना भेडसावत आहेत विविध समस्या

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधांमुळे उद्योजकांना विविध समस्या भेडसावत आहेत‌. उद्योजकांनी या निर्बंधांना विरोध केला असून, विविध समस्यांचा पाढा वाचला आहे. याबाबत पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. 

लघु उद्योजक संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिका औद्योगिक क्षेत्रात 11 हजार उद्योग आहेत. यापैकी 70 टक्के उद्योगांना औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनची गरज लागते. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात शंभर टन क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने मागील लॉकडाउन कालावधीत केली होती.

परंतु, अद्याप हा प्रकल्प उभारलेला नाही. रुग्णांचा ऑक्सिजन कमी करावा, असे उद्योजकांचे अजिबात म्हणणे नाही. मात्र, उद्योगांना लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी 10 एप्रिलपर्यंत परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. या कालावधीत ते शक्य होणार नाही. म्हणून मुदत 15 एप्रिलपर्यंत करावी. तसेच, नवीन 100 टन क्षमतेचा प्रकल्प तातडीने उभारावा. जेणेकरून उद्योग व आर्थिक चक्र सुरूच राहील.

पत्रात पुढे असे म्हटले आहे की, महापालिका कार्यक्षेत्रात एमआयडीसी भोसरी, चिंचवड, पिंपरी तसेच सेक्टर 07 व 10, शांतिनगर, गुळवेवस्ती, आनंदनगर, चिखली, पवार वस्ती, कुदळवाडी, नवणेवस्ती, शेलारवस्ती ज्योतिबानगर, तळवडे आदी औद्योगिक क्षेत्राचा समावेश होतो. येथे सूक्ष्म, लघु व मध्यम अशा उद्योगात साडेचार लाख कामगार आहेत.

सध्या महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रांमधील नमुन्यांचा रिपोर्ट मिळण्यास दोन दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, प्रशासनाने 10 एप्रिलपर्यंत कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. इतक्या कमी वेळेत साडेचार लाख कामगारांची चाचणी करणे शक्य नाही. त्यामुळे चाचणीची मुदत वाढवून द्यावी. तसेच, एमआयडीसी कार्यक्षेत्रात काही ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करावीत.

कडक निर्बंधांमुळे उद्योगांसाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध होत नाही. तसेच, उद्योजकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते कच्च्या मालाची साठवणूक देखील करु शकत नाहीत. परिसरातील 70 टक्के उद्योजक दररोज किरकोळ मालाची खरेदी करतात त्यामुळे दुकाने खुली करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.