Mumbai News : मंत्रालयात 18 मे पासून सर्व सामान्य नागरिकांना मिळणार प्रवेश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे येत्या 18 मे पासून मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांनाही प्रवेश मिळणार आहे. मंत्रालयात येणा-या अभ्यांगतांना प्रवेशपास देण्यासाठी राबविण्यात येत असलेली Visitor Pass Management System (VPMS) 18 मे 2022 पासून पूर्ववत सुरु करण्यात येणार आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश मिळावा यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी सातत्याने राज्य शासनाशी पत्रव्यवहार केला होता.

जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणू रोगाचा प्रसार टाळण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून गृह विभागाने 16 मार्च 2020 रोजी मंत्रालयात येणा-या अभ्यागतांना प्रवेशपास देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या Visitor Pass Management System (VPMS) प्रणालीव्दारे मंत्रालय प्रवेशपास देण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली होती तसेच सामान्य जनतेच्या सुविधेसाठी मंत्रालय प्रवेशव्दाराजवळ असलेल्या प्रवेशपास खिडक्यांच्या ठिकाणी बाहेरुन येणारे टपाल स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली. याकरिता मंत्रालय प्रवेशपास देण्यासाठी राबविण्यात येत असलेली VPMS प्रणाली पूर्ववत सुरु करण्यात आल्यानंतर या खिडक्यांचा वापर करण्यासाठी खिडक्यांचा ताबा परत गृह विभागास देण्यात यावा, या अटीच्या अधीन राहून गृह विभागाची मान्यता देण्यात आली होती.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भवाच्या काळात केंद्र शासन, आरोग्य विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाव्दारे वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या अधिसूचना, परिपत्रक व शासन निर्णयाव्दारे देण्यात आलेल्या सूचना व लावण्यात आलेल्या निर्बंधानुसार हे आदेश लागू करण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीत विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच सर्वसामान्य जनतेकडून मंत्रालयात सर्वसामान्य जनतेसाठी मंत्रालय प्रवेश सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. तसेच, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून 31 मार्च 2022 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्रालयात येणा-या अभ्यांगतांना प्रवेशपास देण्यासाठी राबविण्यात येत असलेली Visitor Pass Management System (VPMS) 18 मे 2022 पासून पूर्ववत सुरु करण्यात येत आहे. ही प्रणाली पूर्ववत चालू केल्यामुळे बाहेरुन येणारे टपाल प्रत्यक्षात मंत्रालयात स्वीकारता येईल. त्याअनुषंगाने या ठिकाणी चालू असलेली टपाल व्यवस्था 18 मे पासून बंद करण्यात येऊन खिडक्यांचा ताबा पुन्हा गृह विभागास देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने सर्व मंत्रालयीन विभागांच्या आस्थापनांना आपल्या स्तरावरुन सूचित करावे, असे उपसचिव शिरीष मोहोड यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.