Pune News : हातकागदापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीं

एमपीसी न्यूज – पुण्यातील हातकागद संस्थेने पर्यावरणपूरक, पुनर्वापर करता येण्याजोग्या व वजनाने हलक्या तरीही बळकट अशा गणेशमूर्तींची निर्मिती करीत आपली अनेक वर्षांची परंपरा जोपासली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्थेने कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या हेतूने 90 % हातकागदाचा लगदा व 10 % शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्यात आल्या आहेत.    

पारंपरिक पद्धतीने घडविलेल्या गणरायाच्या या नऊ इंचांच्या मूर्तींचे वजन केवळ 500 ग्रॅम असले तरी त्या बळकट आणि सहज हाताळण्याजोग्या आहेत, हे विशेष. संस्थेच्या वतीने तीन प्रकारांमध्ये या नऊ इंचांच्या मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. यामध्ये पारंपरिक रंगांचा वापर करीत बनविलेल्या मूर्ती, केशरी रंगातील सोनेरी डिझाईन असलेल्या मूर्ती व खास लहान मुलांना स्वत:च्या हाताने (डू इट युवरसेल्फ प्रकाराने) रंगविता येण्यासाठी पांढ-या रंगातील मूर्तींचा समावेश आहे. लहान मुलांसाठी उपलब्ध मूर्ती रंगविण्यासाठी पोस्टर कलर्स आणि ब्रश देशील पुरविण्यात येणार असल्याने त्या रंगविताना मुलांना विशेष आनंद मिळेल हे नक्की.

हातकागदापासून बनविलेल्या खास बॉक्समध्ये उपलब्ध असलेल्या या मूर्तींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाण्याच्या बादलीत विसर्जन केल्यानंतर पाण्यामध्ये त्या सहज विरघळून जातात. शिवाय पुन्हा कागद्याच्या लगद्यामध्ये रुपांतर करून त्यांचा पुनर्वापर देखील करता येऊ शकतो. पुढील वर्षीसाठी नवे रंग देत या मूर्ती वापरणे शक्य आहे.

या मूर्तींसोबतच पेण येथील मूर्तीकारांनी कागदाचा लगदा व शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्ती शिवाजीनगर परिसरातील कृषी महाविद्यालयाला लागून असलेल्या के. बी. जोशी मार्गावरील पुणे हातकागद संस्थेच्या आवारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शिवाय संस्थेच्या फेसबुक व इन्स्टाग्राम पेज वर देखील या संदर्भात अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.