Pimpri : ठाकरे चित्रपटातील संभाजी महाराजांचा अपमान करणारे दृष्य वगळा – संभाजी ब्रिगेडची मागणी

एमपीसी न्यूज – ठाकरे चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारे दृष्य वगळावे अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सतीश काळे यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

या दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, शुक्रवार दि.२५ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनांवर आधारित ठाकरे हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्याबद्दल शंकाच नाही. मात्र, चित्रपटामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारा अभिनेता नबाजमुद्दीन सिध्दीकी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात पांढ-या रंगाच्या चपला घालून पुष्पहार अर्पण करताना दिसत आहे. त्यामुळे शंभुप्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत. त्याकरिता सदरचे दृष्य चित्रपटांमधून वगळावे अन्यथा ठाकरे चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. तसेच संभाजी ब्रिगेड या चित्रपटावर बहिष्कार टाकणार आहे. या निवेदनांवर धनंजय पवार, एल. पी.माने, राजेश सामाले यांच्या स्वाक्ष-या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.