Chinchwad : नाताळ सणासाठी चिंचवड रेल्वेस्थानकावर एर्नाकुलम व करमाला गाडीला थांबा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या 23 डिसेंबर ते 06 जानेवारी दरम्यान पुणे येथून दर सोमवारी सुटणारी पुणे-एर्नाकुलम हॉलिडे स्पेशल हमसफर वातानुकूलित (एस.सी.) गाडी चिंचवड रेल्वे स्थानकावर येता-जाता थांबणार आहे. तसेच पुणे येथून सोमवार दि.23 व 30 डिसेंबर रोजी दोनच दिवस फक्त जाण्यासाठीच धावणारी पुणे-करमाला एक्सप्रेस गाडी चिंचवड रेल्वे स्थानकावर थांबणार आहे, असे मध्य रेल्वेच्या परिचलन विभागाच्या वतीने चिंचवड रेल्वेस्थानकाचे प्रमुख अनिल नायर यांनी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांना कळविले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात नोकरी व्यवसायानिमित्त मल्ल्याळी, ख्रिश्चन, मलबारी, साऊथ इंडियन नागरिक मोठ्या संख्येने राहतात. नाताळ सणानिमित्त त्यांना पुणे रेल्वेस्थानक व खासगी ट्रॅवलद्वारे महागडा प्रवास करावा लागतो, याची दखल चिंचवड प्रवासी संघ, पुणे मल्याळी फेडरेशनच्या वतीने घेतली आहे. गेली अनेक वर्षे कोकणवासी, गोवा, त्रिचूर, मेंगलोर, कन्नूर आदी भागातील येथील रहिवाशांसाठी एर्नाकुलम एक्सप्रेस गाडीला चिंचवड रेल्वेस्थानकावर प्रथम हंगामी थांबा व नंतर प्रवाशांच्या चढ-उताराची माहिती संकलित करून कायमस्वरूपी थांबा देण्यासाठी 1989 सालापासून प्रयत्न करीत आहे.

मागील सुट्टीच्या हंगामात 15 एप्रिल ते 5 जूनपर्यंत चिंचवड येथे थांबा दिला होता. आता नाताळ सणानिमित्त का होईना थांबा दिल्यामुळे चिंचवड प्रवासी संघाने रेल्वे खात्याचे अभिनंदन केले आहे. पुणे-एर्नाकुलम हॉलिडे स्पेशल वातानुकूलित (एससी) (ट्रेन क्रमांक 01467)  दर सोमवारी चिंचवड येथे रात्रौ 8 वा.09 मि. थांबणार आहे. त्याला दोन मिनिटांचा थांबा असणार आहे. संपूर्ण गाडी वातानुकूलित असणार आहे. तसेच एर्नाकुलम-पुणे (ट्रेन क्रमांक 01468) दर बुधवारी एर्नाकुलम येथून पहाटे 5 वा.30 मिनिटांनी सुटणार आहे. गुरुवारी सकाळी 8 वा.48 मि. चिंचवड येथे थांबणार आहे.

पुणे-करमाली एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 01497) ही गाडी येणार्‍या दोन्ही सोमवारी दि.23 व 30 डिसेंबर रोजी पुणे येथून रात्रौ सुटणारी चिंचवड रेल्वे स्थानकावर रात्रौ 9 वाजून 09 मिनिटाला थांबणार आहे, तिचा दोन मिनिटांचा थांबा आहे. पुणे-एर्नाकुलम हॉलिडे स्पेशल हमसफर वातानुकूलित गाडीला चिंचवड, लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिर्विम, करमाली, मडगाव, कारवार, कुमठा, मुरुडेश्वर, मुकांबीक रोड, बायंदूर, कुंदापुरा, उडपी, मुल्की, सुरत्काळ, टोकूर, मेंगलोर जंक्शन, कासारगुढ, कन्नूर, कोझी कोडे, शैरनोर जंक्शन, त्रिचूर, अलुवा व एर्नाकुलम असे थांबे असणार आहेत. एकूण 1421 कि.मी. चा प्रवास असणार आहे.

पुणे-करमाली एक्सप्रेस गाडीला चिंचवड, लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, मढगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदूर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी असे थांबे असणार आहेत. पुणे येथून सोमवारी दि.23 रोजी रात्रौ 8 वाजून 55 मिनिटांनी सुटून मंगळवारी दुपारी 12.30 वाजता. पोहोचणार आहे. एकूण 667 कि.मी. अंतरासाठी 16 तास 20 मिनिटांचा प्रवास असणार आहे.

नाताळ सणासाठी जाणार्‍या प्रवाशांचे स्वागत करून त्यांना नाताळ सणाच्या शुभेच्छा चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार पदाधिकारी अ‍ॅड. मनोहर सावंत, सूरज आसदकर, मुकेश चुडासमा, निर्मला माने, संगीता जाधव, हार्दिक जानी, मनोहर जेठवाणी, केशना जेठवाणी, संभाजी बारणे, ज्योती डोळस, शरद चव्हाण, नारायण भोसले यांना दिल्या आहेत. यानिमित्ताने वरील सर्वजण उपस्थित राहून गाडीचे स्वागत करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.