Esanjeevaniopd App : मोफत वैद्यकीय सल्ल्यासाठी शासनाचा ई-संजीवनी ओपीडी मोबाईल ॲप लॅान्च

Government launches e-Sanjeevani OPD mobile app for free medical advice

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे खासगी रुग्णालये बंद असल्याने सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करता येईल.

या ॲपच्या माध्यमातून राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप यांचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो. राज्यभरात आतापर्यंत 1606 जणांनी यासेवेचा लाभ घेतला.

ही सेवा आतापर्यंत केवळ संगणक आधारित ॲप्लिकेशनवर असल्याने त्याच्या वापरावर मर्यादा होती. मात्र, आता मोबाईल ॲप तयार झाल्याने त्याचा वापर सामान्यांकडून अधिक प्रमाणात वाढेल. त्यानुसार आवश्यकता भासल्यास डॉक्टरांची संख्या वाढविता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मेमध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली. त्याचबरोबर या सेवेचे मोबाईल ॲप महिनाभरात तयार करण्यात येईल असे त्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात सांगितले होते. त्यानुसार एक महिन्याच्या आत हे ॲप तयार झाले आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 या काळात उपलब्ध असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जात नाही. रविवारी ही सेवा उपलब्ध नसते.

‘ई-संजीवनी ओपीडी ॲप’ असे काम करते

वापरकर्त्याने आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे ॲपवर नोंदणी केल्यानंतर नोंदवलेल्या नंबर वर एक ओटीपी येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरता येतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळख क्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.

लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटिफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळख क्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते. डॉक्टरांशी चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रिप्शन प्राप्त होते. या ई-प्रिस्क्रिप्शनच्या माध्यमातून तुम्ही औषधे खरेदी करू शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.