Vadgaon Maval : वडगाव मावळ मध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते  दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते  दुपारी 2 वाजेपर्यंत या वेळेत व फक्त दुग्ध व्यवसाय दुकाने सायंकाळी 6 ते रात्री 8 या अतिरिक्त वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शनिवार व रविवारी वीकएंड लाॅकडाऊनचे निर्बंध पाळावेत असा आदेश प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिला आहे. 

वडगाव शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली नागरीक बाजारपेठेत गर्दी करत आहेत. ही गर्दी रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी निर्बंधांत वाढ केली आहे. राज्य शासनाने लाॅकडाऊनची नियमावली जाहीर करताना अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत यावेळेत सर्व नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिलेला आहे.  तसेच वीकएंड लाॅकडाऊनमध्ये दर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.  त्यानुसार वडगाव शहरामध्ये आदेशाचे पालन होत आहे.

परंतु अत्यावश्यक सेवा सुरू असलेल्या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत शहरात होणारी रूग्ण वाढ लक्षात घेऊन त्यावर उपाय योजना राबविण्यासाठी प्रस्ताव वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्याकडे पाठविला होता.

त्याबाबत प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी ताबडतोब आदेश काढून वडगाव शहरातील अत्यावश्यक दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत तर दुध विक्रीची दुकाने सायंकाळी सहा ते आठ या अतिरिक्त वेळेत सुरू ठेवावीत व वीकएंड लाॅकडाऊनचे निर्बंध पाळावेत असे निर्देश दिले असून तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले व पोलीस प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवावे अशी सुचना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.