Pimpri News : दोन महिन्यानंतरही काँग्रेसला मिळेना शहराध्यक्ष

महापालिका निवडणूक वर्षभरावर येवूनही काँग्रेस शहराध्यक्षाविना

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात संघटन कमकुवत झालेल्या काँग्रेसला दोन महिन्यानंतरही सक्षम शहराध्यक्ष मिळेना झाला आहे. शहराध्यक्षपदासाठी 15 जणांनी मुलाखती दिल्या असतानाही शहराध्यक्ष जाहीर होत नाही. नवीन चेह-याचा शोध सुरुच आहे.  महापालिका निवडणूक वर्षभरावर येवूनही काँग्रेस शहराध्यक्षाविना आहे. कॅप्टन जाहीर होत नसल्याने कार्यकर्ते सैरभर झाले आहेत.

सचिन साठे यांनी 11 नोव्हेंबर 2020 रोजी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी डावलल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. त्यानंतर महिला शहराध्यक्षांसह पाच पदाधिका-यांनी राजीनामे दिले होते. कालांतराने साठे यांचा राजीनामा मंजूर केला.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस आणि पिंपरी – चिंचवडचे पक्ष निरीक्षक राजेश शर्मा, नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर 24 नोव्हेंबर 2020 रोजी शहरात आले. त्यांनी शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या  मुलाखती घेतल्या. तब्बल पंधरा इच्छुकांनी निरीक्षकांशी संपर्क करून इच्छा व्यक्त केली. लवकरच नवीन शहराध्यक्षांची घोषणा केली जाईल असे निरीक्षकांनी सांगितले. पण, मुलाखतीला देखील सव्वा महिना उलटून गेला. तरीही शहराध्यक्ष जाहीर केला जात नाही.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. एक वर्षावर निवडणूक येवून ठेपली आहे. त्यादृष्टीने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांनी तयारी सुरु केली आहे. कोरोनामुळे तीन नगरसेवकांचे निधन झाल्याने पोटनिवडणुकाही होणार आहेत. या निवडणुकांचीही तयारी राजकीय पक्षांनी केली आहे.  पण, काँग्रेसला शहराध्यक्षच मिळेना झाला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते सैरभर आहेत. दोन महिने कॅप्टनच जाहीर होत नसेल तर आम्ही कसे संघटनेचे काम करायचे असा सवाल काँग्रेसप्रेमी करत आहेत.

‘यांनी’ दिल्या आहेत मुलाखती!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते संदेश नवले, दिलीप पांढारकर, एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, पिंपरी विधानसभा किसान काँग्रेस सभा अध्यक्ष सरिता जामनिक, असंघटित कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, माजी शहर युवक अध्यक्ष सचिन कोंढरे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, अशोक काळभोर, रामचंद्र माने, आबासाहेब खराडे, सुदाम ढोरे, रवी खन्ना यांच्यासह पंधरा इच्छुकांनी शहराध्यक्षपदासाठी मुलाखती दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.